Get it on Google Play
Download on the App Store

सोनी 4

मनूबाबाला हसू आले. ज्या वस्तूची दहशत तो दाखवू पाहात होता तीच वस्तू सोनीला गमतीची वाटत होती. सोनीला खोटी भीती घालायची नाही असे त्याने ठरविले. मोकळेपणाने सोनी वाढू दे.

त्याने सोनीसाठी मुद्दाम सुंदर कापड विणले. त्याचे कपडे तिच्यासाठी करण्यात आले. किती सुंदर दिसे सोनी त्या कपड्यांत. सोनीसाठी तो चांगली भजी करी. तिच्यासाठी दूध घेई. सोनीच्या भातावर तूप वाढी. तिच्या पोळीला तूप लावी. मनूबाबाचे पैसे आता शिल्लक पडत नसत. पूर्वी पैसे भराभर साठत. मोहरा जमत. परंतु आता? पूर्वी पैशांना हेतू नव्हता. ते निर्हेतुक पैसे भराभर जमत असत. परंतु आता पैशांचा उपयोग होऊ लागला. पूर्वी पैशांसाठी पैसे होते. आता सोनासाठी ते हवे होते.

सोनी चंद्राच्या कोरेप्रमाणे वाढत होती. मनूबाबा तिला घेऊन बसे. तो तिला गोष्टी सांगे. कधी कधी तो तिच्याबरोबर खेळे. तो तिला धरी. ती त्याला धरी. मनूबाबाची पूर्वीची निराशा गेली. पूर्वी त्याच्या जीवनात अर्थ नसे. यंत्राप्रमाणे तो काम करी. कापड विणी. पैसे साठवी. ते पैसेच कुरवाळी, तेच हृदयाशी धरी. परंतु आता त्याच्या जीवनात प्रकाश आला. प्रेम, स्नेह, दया, माणुसकी, कर्तव्य, आनंद यांचे बंद झरे पुन्हा वाहू लागले. जीवनाला आता अर्थ प्राप्त झाला. जीवनात गोडी आली. पूर्वी मनूबाबाचे डोळे कसे तरी भयाण दिसत, शून्य दिसत. परंतु आता तेच डोळे प्रेमळ दिसू लागले. पूर्वी त्याच्या चोंडावर कोणतीच भावना नसे. परंतु आता ते तोंड सात्त्विकतेने फुलले होते. पंधरा वर्षांत मनूबाबा हसला नाही. परंतु आता सोनीशी तो हसे, खेळे. मनूबाबा पुन्हा मनुष्य झाला. पूर्वीचे पाषाणमय जीवन संपले. मनूबाबाचा जणू पुनर्जन्म झाला. लहानशी सोनी. परंतु तिने ही क्रान्ती केली होती. तिचा हात अद्याप धरावा लागत होता. तिला नीट बोलता येत नव्हते. परंतु म्हातार्‍या मनूबाबाला न कळत ती आधार देत होती. त्याचे जीवन ती फुलवीत होती. त्याच्या जीवनात ती रस ओतीत होती. आनंद ओतीत होती. जगात असे चमत्कार होतात. एखाद्या लहान मुलाचा चिमणा हात माणसाचा उद्धार करू शकतो, माणसाला विनाशापासून वाचवू शकतो.

सोनी आता बरीच मोठी झाली. ती पुष्कळदा साळूबाईकडे जाई. तिच्याकडे खेळे. कधी ती भातुकली करी. रामू तिचा खेळ मांडून देई. परंतु एखादे वेळेस तो भातुकलीचे सारे मटकावून टाकी. मग सोनी संतापे. ती सारा खेळ फेकून देई. बुटकुळी भिरकावी. मग रामू पुन्हा तिचा खेळ मांडी, तिची समजूत घाली.

“रामू, का रे तिला रडवतोस?” साळूबाई रागाने विचारी.

“तिला मागून हसविण्यासाठी.” तो लबाड उत्तर देई.

मनूबाबा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
जन्मभूमीचा त्याग 1 जन्मभूमीचा त्याग 2 जन्मभूमीचा त्याग 3 एकाकी मनू 1 एकाकी मनू 2 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 1 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 2 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 3 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 4 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 5 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 6 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 7 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 8 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 9 सोने परत आले 1 सोने परत आले 2 सोने परत आले 3 सोने परत आले 4 सोने परत आले 5 सोने परत आले 6 संपतरायाचे लग्न 1 संपतरायाचे लग्न 2 संपतरायाचे लग्न 3 सोनी 1 सोनी 2 सोनी 3 सोनी 4 सोनी 5 सोनी 6 सोनी 7 सोनी 8 सोनी 9 सोनी 10 सत्य लपत नाही 1 सत्य लपत नाही 2 सत्य लपत नाही 3 सत्य लपत नाही 4 सोनीचा नकार 1 सोनीचा नकार 2 सोनीचा नकार 3 सोनीचा नकार 4 सोनीचा नकार 5 सोनीचा नकार 6 सोनीचे लग्न 1 सोनीचे लग्न 2 सोनीचे लग्न 3 सोनीचे लग्न 4 सोनीचे लग्न 5 सोनीचे लग्न 6 सोनीचे लग्न 7 सोनीचे लग्न 8 सोनीचे लग्न 9 सोनीचे लग्न 10 सोनीचे लग्न 11 जन्मभूमीचे दर्शन 1 जन्मभूमीचे दर्शन 2 जन्मभूमीचे दर्शन 3