सोनीचा नकार 1
सोनी व मनूबाबा प्रेमळपणे गोष्टी बोलत बसली होती. झोपडीत दिवा होता.
“बाबा, तुम्ही अंगावर घ्या ना ती शाल. आज बाहेर थंडी आहे. घालू तुमच्या अंगावर?” प्रेमाने सोनीने विचारले.
“तू ज्या दिवशी मला सापडलीस, त्या दिवशी याच्याहून अधिक थंडी होती आणि तू लहान असूनही उघड्यातून रांगत माझ्या झोपडीत आलीस. माझ्या लहान सोनीला थंडी बाधली नाही. मी तर मोठा आहे. आज थंडीही तितकी नाही. मला कशी बाधेल?” मनूबाबा म्हणाले.
“बाबा, आज सारं सोनं सापडलं. कल्पनाही नव्हती.”
“तुझ्या लग्नासाठी आले. रामूही गरीब आहे. तिला आता दोन दागिने करता येतील. तुला आवडतात की नाही दागिने?”
“मला आवडतात. आता आपली बाग लवकर तयार करायची. आमच्या लग्नाला आमच्या बागेतील फुलं. त्या फुलांना आईच्या श्वासोच्छवासाचा सुगंध येईल. आईचे आशीर्वाद त्या फुलांतून मिळतील. नाही बाबा?” तिने सदगदित होऊन विचारले.
“होय बेटा. आईच्या आशीर्वादाहून थोर काय आहे? मरता मरता तिनं स्वत:चं लुगडं फाडून ते तुझ्याभोवती गुंडाळून ठेवलं होतं. जणू तिनं आपलं प्रेम तुझ्याभोवती गुंडाळून ठेवलं. आई मेली. परंतु तिचं प्रेम मागं राहिलं. प्रेम अमर आहे. त्या प्रेमाची स्मृतीही आपलं पोषण करीत असते. त्या प्रेमाची स्मृतीनं उत्साह येतो, सामर्थ्य येतं. आपणास निराधार असं वाटत नाही.” मनूबाबा बोलत होते.
“बाबा, तुम्ही रामूच्या आईजवळ बोललेत का? रामूची आई किती मायाळू आहे! त्या दिवशी माझं जरा डोकं दुखत होतं, तर लगेच त्यांनी तेल चोळलं. किती तरी त्या माझं करतात.”
“साळूबाई खरंच थोर आहेत. त्यांनी मला कितीदा तरी धीर दिला आहे. तू लहानपणी कधी आजारी पडलीस, तर लगेच यायच्या. औषध उगाळून द्यायच्या. तुला त्यांनी न्हाऊमाखू घातलं आहे. तुझं सोनी नाव त्यांनीच सुचविलं. साळूबाईसारखी सासू मिळणं म्हणजे पूर्वपुण्याईच हवी. मी अद्याप त्यांच्याजवळ बोललो नाही. परंतु बोलेन. साळूबाई नाही म्हणणार नाहीत. त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. जसा रामू, तशी त्यांना तू. तू सर्वांना आवडतेस.” मनूबाबांनी सोनीच्या केसांवरून हात फिरवीत म्हटले.