एकाकी मनू 1
मनू आता रायगावात होता. या गावात येऊन त्याला पंधरा वर्षे झाली. परंतु त्याची कोणाशी मैत्री नव्हती. गावाच्या टोकाला त्याची लहानशी झोपडी होती. ही झोपडी म्हणजे त्याचे जग. या झोपडीत त्याचा विणण्याचा माग होता. विनू दिवसभर विणीत असे. चांगला विणकर म्हणून त्याची प्रसिद्धी झाली होती. मोठमोठ्या श्रीमंतांच्या बायकांकडून त्याला काम येई. त्याला भरपूर काम मिळे व मजुरीही चांगली मिळे.
मिळालेले पैसे मोजणे एवढाच काय तो मनूचा आनंद होता. त्याला दुसरा आनंद नव्हता. सायंकाळ झाली म्हणजे मनूचा माग थांबे. मग तो मिणमिण दिवा लावी. चुलीवर भाकरी भाजी. ते साधे जेवण संपवून तो आपल्या मागाजवळ येई. तेथे जमिनीत पुरलेले एक लोखंडी भांडे असे. त्यातील सोन्याची नाणी काढून तो मोजीत बसे. सार्या खिडक्या बंद असत, दारे लावलेली असत, आणि मनू ती सोन्याची नाणी हातांत घोळवीत बसे. त्या सोन्याच्या मोहरा तो हृदयाशी धरी. जणू त्याचे ते जीवनसर्वस्व होते.
सोन्याची नाणी त्या लोखंडी भांड्यात मावेनाशी झाली. मनूने दोन चामड्याच्या पिशव्या विकत घेतल्या, त्यांत ती नाणी त्याने ठेवली. सोन्याच्या नाण्यांत नेहमी भर पडत असे. मनू चैन करीत नसे. त्याच्या अंगावर फाटके वस्त्र असे. तो चांगले पदार्थ खात नसे. ना दुधातुपाचा थेंब. कोरडी भाकर तो पाण्याबरोबर खाई. सोन्याचे नाणे अधिक कसे पिशवीत पडेल याचीच त्याला अहर्निश चिंता असे.
मनूचे जीवन केवळ यांत्रिक झाले होते. दिवसभर तो खटक खटक मागाचा आवाज त्याच्या कानांत भरत असे, आणि रात्री त्या नाण्यांचा आवाज. तिसरा आवाज त्याला माहीत नव्हता. त्याचे डोळे विचित्र दिसत. ना त्या डोळ्यांत कोणताही भाव. ते डोळे यांत्रिक झाले होते. त्या डोळ्यांचे पाहाणे अर्थहीन झाले होते. मनूची मुद्रा फिक्कट झाली होती. तोंडावर ना तेज ना प्रसन्नता. मनू एखाद्या भुतासारखा भासे. गावातील लोकांना त्याची भीती वाटे. तरीही त्याच्याकडे कधी कधी बायका आपली मुले घेऊन येत. मुलांचे रोग कसे बरे करावेत ते मनूला माहीत होते. त्याला अनेक औषधे माहीत होती. तो साधी साधी औषधे सांगे. झाडांचे पाले, वनस्पतींची मुळे हीच त्याची औषधे, परंतु मुलांचे रोग बरे होत. बायका त्याला धन्यवाद देत. जरी असे धन्यवाद मिळत असले तरी एक प्रकारची मनूबद्दलची भीतीही बायकांना वाटे. कोणी म्हणत, “मनूला भूतविद्या येते. पिशाच्चं त्याला वश आहेत, म्हणून त्याला रोग बरे करता येतात. नाही तर या बावळटाला कोठली येणार वैद्यकी?” कोणी म्हणत, “मनू अधांतरी चालतो. शरीरातून आपला प्राण वाटेल तिथं नेतो. पुन्हा शरीरात येतो. त्याला योगविद्या येते.” असे नाना तर्कवितर्क त्याच्याविषयी चालत.
मुले त्याच्या झोपडीत डोकावत व म्हणत, “ते पाहा भूत बसलं आहे. मागावर बसून विणीत आहे. कसा म्हातारा दिसतो नाही?” कोणी त्याला ‘ए म्हातारड्या मनू’ अशी हाक मारीत. मनू त्यांच्याकडे बघे. मुले पळून जात.