सोने परत आले 2
गावात लक्ष्मीपूजनाचा महोत्सव सुरू होता. दिगंबररायाकडे तर सर्वांत मोठा उत्सव. या दिवशी त्याच्याकडे गावातील सारे लोक जमत. आसपासच्या खेड्यापाड्यांतील मित्र येत. त्यांची कुळेही येत. बैठका घातलेल्या होत्या. तक्के लोड होते. सुंदर समया तेवत होत्या. पान सुपारीची तबके होती. मंगल वाद्ये वाजत होती. अत्तर, गुलाब होते. बार वाजत होते. दारूकाम सोडले जात होते. संपतराय सर्वांचे स्वागत करीत होता. दिगंबरराय पूजा करीत होते. ठकसेन त्या वादळाच्या दिवसापासून कोठे गेला तो गेला. मेलेली घोडी मात्र आढळली. परंतु ठकसेनाचा पत्ता नाही. त्याच्यावर कोणाचे फारसे प्रेम नव्हतेच. त्यामुळे तो घरी नव्हता तरी कोणाला रुखरूख वाटली नाही.
दिगंबररायाकडे दलपतराय व त्यांची मुलगी इंदुमती हीही आली होती. इंदुमती प्रेमाने संपतकडे बघत होती. त्यालाही आनंद होत होता. संपतच्या वडिलांना नमस्कार करून दलपतराय म्हणाले, “दिगंबरराय, लक्ष्मीपूजन तर केलंत. परंतु घरात गृहलक्ष्मी केव्हा आणणार? आमची इंदू तुमच्या संपतलाच द्यायची. दोघांचा जोडा किती शोभतो! आपण दोघे म्हातारे झालो. या दोघांचे हाच एकमेकांच्या हातात देऊ आणि आपण डोळे मिटू.”
“दलपतराय, माझीही हीच इच्छा आहे. येत्या मार्गशीर्षात करून टाकू लग्न. सारं वेळीच झालं पाहिजे. ऐकलंस ना संपत?” पिता म्हणाला.
“चला ना बाबा!” इंदुमती पित्याला म्हणाली.
“अग, आता या घरातच तुला राह्यला यायचं आहे. इथंच रमायचं आहे. लवकर चला का म्हणतेस?” पित्याने विचारले.
“ती लाजते आहे. आपल्या बोलण्यानं दोघांना मनात गुदगुल्या होत असतील. परंतु वरून निराळं दाखवायचं. प्रेमाची ही रीतच असते. फूल हळूहळू फुलतं. लाजत लाजत भीतभीत फुलतं. खरं ना?” दिगंबरराय म्हणाले.
जगात दिवाळी चालली होती. लक्ष्मीपूजने होत होती. लाखो पणत्या पाजळल्या जात होत्या. जणू आकाशातील सारे तारेच पृथ्वीवर आले होते. परंतु त्या आनंददायक चार दिवसांत जगातील दु:खी जीव काय करीत होते? काही दु:खं अशी असतात की, ती आपण कधीही विसरू शकत नाही. उलट ती दु:खे अशी मंगल प्रसंगी अधिकच तीव्रतेने भासतात.
ती पहा एक अनाथ स्त्री. एका लहान मुलाला वक्ष:स्थळाशी धरून ती जात आहे. तिच्या अंगावर फाटके लुगडे आहे. तिचे हृदयच फाटलेले आहे. डोळ्यांतून पाणी गळत आहे. ती तरुण आहे. ती सुंदर आहे. परंतु तिचे तारूण्य व तिचे सौंदर्य कळाहीन दिसत आहे. जगाने तिची वंचना केली आहे. कोणी तरी पाप्याने तिला फसविले आहे. भोळा जीव. ती विश्वासून होती. आपला पती आपणाला एके दिवशी घरी नेईल अशी तिला आशा होती. परंतु किती दिवस आशा खेळवायची? सुंदर मूल झाले. मूल वर्षाचे होत आले तरी पती स्वगृही नेईना. जगात कसे राहावयाचे? लोक कुजबुजू लागतात. ती टीका कशी सहन करावयाची? आणि निष्पाप मनाला तर फारच कष्ट होतात.