सोने परत आले 1
मनूबाबाने पुन्हा दुप्पट जोराने काम करण्यास सुरुवात केली. काम करता करता पूर्वीच्या मोहरा त्याला एकदम आठवत व त्याचा धोटा तसाच राही. परंतु पुन्हा त्याला जोर येई. गेले तर गेले. रात्रंदिवस काम करून पुन्हा मिळवू. पुन्हा मोहरा जमवू. पुन्हा रात्री मोजीत बसेन, या बोटांनी त्यांना कुरवाळीन, ते सोने हृदयाशी धरीन. मध्येच तो निराशेचा, दु:खाचा सुस्कारा सोडी. परंतु पुन्हा निश्चय करून धोटा फेकी. आता रात्रीची झोपही त्याने कमी केली. आधी त्याला झोप फारशी येतही नसे. ते सोनेच त्याला सारखे दिसे. ध्यानी मनी सोने. रात्रीसुद्धा तो विणीत बसे. रात्रीही खटक खटक आवाज चाले. तुटलेला धागा एखादे वेळेस त्याला रात्री दिसत नसे. परंतु तो कष्टाने तो शोधी व सांध करी. सोन्याची भेट व्हावी म्हणून पुन्हा अशी तपश्चर्या अहोराक्ष सुरू झाली. काळपुरुष ज्याप्रमाणे जीवनाचे विराट वस्त्र रात्रंदिवस विणीत असतो, त्याप्रमाणे मनूबाबा रात्रंदिवस ठाण विणीत बसे.
असे करता करता दिवाळी आली. गावात सर्वत्र आनंद होता. घरोघर करंज्या, अनारसे चालले होते. प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या. रात्रीच्या वेळी हजारो दिवे रांगेने लावले जात होते. मोठी मौज दिसे. ते सहस्त्रावधी दिवे पाहून प्रसन्नता वाटे.
“मनूबाबा, दिवाळीचे यंदा घरी चार दिवे लावा. इतक्या वर्षांत लावले नाहीत, आज तरी लावा; आणि उद्या लक्ष्मीपूजन. कदाचित् उद्या तुमचं गेलेलं सोनं परत येईल. आपोआप गेलं. आपोआप परत येईल. असं एखादे वेळेस होतं. केवळ सोन्यासाठी वेडे नका होऊ, असं जणू देवाला तुम्हांला शिकवायचं असेल. सोन्यापेक्षाही सुंदर अशा पुष्कळ गोष्टी जगात अहोत. नुसत सोनं जमवून काय कामाचं? ते कोणाच्या उपयोगी आलं तर उपयोग. नाही तर दगड नि सोनं सारखीच किंमत. ती बाहेर माती पडली आहे, तसं तुमचं सोनं घरात पडलेलं होतं. देव हे तुम्हांला शिकवू पाहात होता. देव दयाळू आहे. कदाचित् तुमचं सोनं परत येईल. ते येवो न येवो. परंतु चार पणत्या लावा. दिव्यांच्या ज्योती सोन्यासारख्या झळकतात. उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी चार दिवे लावा, आणि ह्या सांजोर्या व हे अनारसे मी आणले आहेत, ते ठेवा. रामूसाठी सारं सारं करावं लागतं. सण सर्वांचा आहे. गरिबी असली तरीही सण साजरा करावा. थोडं गोडधोड करावं. आनंद करावा. खरं ना मनूबाबा?” साळूबाई म्हणाली.
ती निघून गेली. दुसरे दिवशी मनूबाबाने खरेच चार दिवे लावले. सुंदर पणत्या झळकू लागल्या. मनूबाबाने आपली झोपडी झाडून स्वच्छ केली. ‘आज गेलेली लक्ष्मी परत येईल. हो, येईल. माझ्या प्रेमाचे, माझ्या श्रमांचे होते ते पैसे. त्या माझ्या मोहरा परत येतील. ते सारं सोनं परत येईल. ते मी हृदयाशी धरीन.’ असे विचार त्या विणकर्याच्या मनात घोळत होते.