Get it on Google Play
Download on the App Store

जन्मभूमीचा त्याग 1

बहुळा नदीच्या तीरावर सायगाव म्हणून एक गाव होता. गाव मोठा सुखी व समृद्ध होता. गावात नाना प्रकारचे धंदे चालत. शेतकरी, विणकरी, रंगारी, पिंजारी, सोनार, सुतार, लोहार , कुंभार- सर्व प्रकारचे लोक होते. गावात भांडण बहुधा होत नसे. मारामारी होत नसे कोणी कोणाचा हेवादावा करीत नसे. सारे गुण्यागोविंदाने नांदत.

सायगावची एक विशिष्ट परंपरा होती. त्या गावचे लोक कधी राजाकडे न्याय मागायला जात नसत. ‘पाप करणारा असेल त्याला देव शिक्षा करीलच’ असे ते म्हणत. ‘पाप करणार्‍याचे मन त्याला खातच असते, आणखी त्याला शिक्षा कशाला?’ असेही कोणी म्हणत. जर गावात अपराध झालाच, तर सारे लोक देवळात जमत. कोणी अपराध केला त्याची चौकशी होई. अपराध करणार्‍याचे नाव देवासमोर सांगण्यात येई. त्याला दुसरी शिक्षा नसे. गावातील सर्व लहान-थोरांना अपराध करणार्‍याचे नाव कळे. त्याच्याकडे सारे लोक ‘हा तो अपराधी’ अशा दृष्टीने बघत. हीच शिक्षा.

सायगावात विनू व मनू दोघे मित्र होते. विनूला मनूशिवाय करमत नसे व मनूला विनूशिवाय. मनू एकटा होता. त्याचे आईबाप मरण पावले होते. त्याची लहान बहीण होती. या बहिणीवर त्याचा फार लोभ. परंतु ती बहीणही देवाघरी गेली. मनूला अपार दु:ख झाले. जीवनात त्याला अर्थ वाटेना. कोणासाठी जगावे, का जगावे ते त्याला कळेना. परंतु विनूमुळे तो वेडा झाला नाही.

मनू विणकर होता. विणण्याची कला त्याच्या बोटांत होती. धाकटी बहीण होती. तेव्हा तिच्यासाठी तो विणी. पैसे मिळवून बहिणीला नटवी. पुढे-मागे बहिणीचे लग्न करावे त्यासाठी तो पैसे साठवी. परंतु बहीण देवाकडे निघून गेल्यावर मनू फारसे काम करीत नसे. देवाने त्याच्या जीवनाचे वस्त्र जणू दु:खाने विणले होते. ते दु:खाचे वस्त्र पांघरून मनू घरी कोपर्‍यात बसे विनू येई तेव्हा मात्र तो जरासा हसे.

असे काही दिवस गेले. एकदा काय झाले, त्या गावात एक परका पाहुणा आला. त्याच्याजवळ बरेचसे पैसे होते. विनूला पैसे पाहिजे होते. विनूच्या मनात पाप आले. त्या श्रीमंताचा खून करावा असे त्याच्या मनात आले. शेवटी त्याने संधी साधून त्या श्रीमंताचा खून केला. त्याची पिशवी त्याने लांबविली. परंतु खून पचवायचा कसा?


मनूबाबा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
जन्मभूमीचा त्याग 1 जन्मभूमीचा त्याग 2 जन्मभूमीचा त्याग 3 एकाकी मनू 1 एकाकी मनू 2 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 1 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 2 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 3 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 4 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 5 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 6 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 7 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 8 जमीनदार व त्याचे दोन मुलगे 9 सोने परत आले 1 सोने परत आले 2 सोने परत आले 3 सोने परत आले 4 सोने परत आले 5 सोने परत आले 6 संपतरायाचे लग्न 1 संपतरायाचे लग्न 2 संपतरायाचे लग्न 3 सोनी 1 सोनी 2 सोनी 3 सोनी 4 सोनी 5 सोनी 6 सोनी 7 सोनी 8 सोनी 9 सोनी 10 सत्य लपत नाही 1 सत्य लपत नाही 2 सत्य लपत नाही 3 सत्य लपत नाही 4 सोनीचा नकार 1 सोनीचा नकार 2 सोनीचा नकार 3 सोनीचा नकार 4 सोनीचा नकार 5 सोनीचा नकार 6 सोनीचे लग्न 1 सोनीचे लग्न 2 सोनीचे लग्न 3 सोनीचे लग्न 4 सोनीचे लग्न 5 सोनीचे लग्न 6 सोनीचे लग्न 7 सोनीचे लग्न 8 सोनीचे लग्न 9 सोनीचे लग्न 10 सोनीचे लग्न 11 जन्मभूमीचे दर्शन 1 जन्मभूमीचे दर्शन 2 जन्मभूमीचे दर्शन 3