१७
हेचि गुह्मा ज्ञान सांगितलें मज । तेणे मी सहज मीची झालों ॥१॥
हेचि मत्स्येंदासी ज्ञान आदिनाथें । कथिलें निवृत्तीनाथें ज्ञानदेवा ॥२॥
तेथुनी हें संती रुढली परंपरा । आदिनाथ गुरु संप्रदायीं ॥३॥
सोळा अभंगाचा लिहुनी प्रबंध । गोदा तटी सिद्ध संत मेळी ॥४॥
उद्धाराया विश्वा धाडिला पैठणीं । उरलें याहोनी नाहीं आतां ॥५॥
येथुनी उपदेश झाला सांग पूर्ण । तारक हे ज्ञान सेवो विश्व ॥६॥
म्हणे जनार्दन वचन बांधी गांठीं । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥७॥