Get it on Google Play
Download on the App Store

नाम भक्ति ज्ञान उपासना दीक्षा । व्यर्थ आत्मसाक्षात्कारें वीण ॥१॥

क्रिया कर्म धर्म साधनें वैराग्य । कृपेविण योग प्राणायाम ॥२॥

राजयोगेवीण केलिया सकळ । होवोनि निर्फळ लाभे शीण ॥३॥

घेती क्लेश दुःख करिती घौती वस्ती । दंडिती जाळिती व्यर्थ देहा ॥४॥

सोशिती सतत श्रम प्रहर आठ । न लभे देव कष्टविल्या देहा ॥५॥

करिती चमत्कार ब्रह्माडींचे सर्व । दाविती भक्तिभाव कळा विद्या ॥६॥

जेथें दंभ वेष चमत्कार सिद्धि । नवजावें कधीं चुकोनिया ॥७॥

असावें सतत श्रीगुरुसन्निध । मोगावा ब्रह्मानंद संसारचि ॥८॥

घेवो नये वेष साधु त्वहि दंभ । दाखवावी ढब नट जैसा ॥९॥

चुकोनि घेतां वेष जाये राजयोग । न भेटेचि मग देव काहीं ॥१०॥

असोनि सकळी वित्त श्रमें मेळवावें । तेणें नित्य भोगावें सेवासुख ॥११॥

जगीं म्हणवावें प्रपंची या मावा । दंडो नये जीवा देहा व्यर्थ ॥१२॥

म्हणे जनार्दन नलमे देव हटीं । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१३॥