बडबडगीत : अंग घुसळे घुसळे....!
भरत उपासनी
अंगणात चिमण्यांचं
अंग घुसळे घुसळे
तेव्हा ढगांच्या पोटात
पाणी जोरात उसळे
मातीमध्ये अंगणात
अंग चिमणी घुसळे
आता येणार पाऊस
याचा संकेतही मिळे
चिमणीचं पावसाचं
कसं अनोखं हे नातं
तिच्या पंखात उसळे
ओल्या पावसाचं गीत
मातीमध्ये चिमणी गं
अंग घुसळ घुसळ
तुझ्या छोट्या पंखांमध्ये
आहे पावसाची कळ