संपादकीय
सादर करीत आहोत, सुट्टी विशेषांक! खास आपल्या लहानग्यांसाठी!!
म्हणजे विषय नव्हते म्हणून लहानग्यांसाठी हा अंक काढावासा वाटला असे नाही, मुलांमध्ये देखील मराठी वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या हेतूने आपल्यासाठी सुट्टी विशेषांक सादर करीत आहे.
ग्लोबलायझेशनमुळे जग जेवढे जवळ आले तेवढी स्थानिक भाषेची जागा आंतरराष्ट्रीय भाषेने घेतली. आपल्या देशात ही जागा आधी हिंदी आणि आता इंग्रजी भाषेने घेतलेली आहे. मग या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना टिकता यावं, लवकरात लवकर पुढे जाता यावं म्हणून पालक लहानपणापासूनच मुलांना 'अ-आ-इ' ऐवजी 'A-B-C' शिकवू लागले आहेत. पालकांना इंग्रजी येत नसलं तरी आपल्या पाल्याला उत्तम इंगर्जी लिहिता वाचता यावं या विचाराने नर्सरीपासूनच मुलांना क्लासेस लावले जातात. स्पर्धेच्या युगात आपलं मूल पुढे राहावं या विचरने पालक हे सर्व करत असतात. पण या सगळ्यामध्ये मुलं आपली मातृभाषा विसरतात. विसरतात म्हणण्यापेक्षा ते आपल्या मातृभाषेपर्यंत पोहोचतच नाहीत. आज देखील असे बरेच तरुण-तरुणी आहेत ज्यांना इंग्रजी उत्तम येतं, पण मातृभाषेत लिहिता-वाचता येत नाही.
गुजराती, कन्नड, तमिळ आणि तेलुगु लोक आपल्या पाल्यांना त्यांच्या भाषेतच शिक्षण देतात आणि त्याच भाषेत व्यवहार करायला सांगतात. इतर राज्यांत स्थलांतरित झाले तरी ते आपली मातृभाषा सोडत नाहीत, आपण मात्र दुकानात गेलो तरी हिंदी किंवा इंग्रजी सुरु करतो. हे सर्व यासाठी सांगावंसं वाटतं, कारण तुम्ही बोलत असलेल्या भाषेचं अनुकरण तुमची पुढची पिढी करत असते. तीन वर्षांचं मूल कळत नसतानाही 'F#ck u' म्हणत, याला जबाबदार त्याच्या अवतीभोवतीची मोठी मंडळी असते.
जरा विचार करा, गेल्या काही वर्षांत Twinkal Twinkal, Roll over सारखे इंग्रजी बालगीते ३डी सह वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध झाले. नवीन बडबडगीते आणि बालगीते देखील आलीत. (म्हणजे त्यांची मागणी देखील तशी आहेच) त्यामानाने मराठीमध्ये खूप कमी प्रमाणात बालसाहित्य तयार झाले. गेल्या काही वर्षांत बालगीते तयार झाली असतील सुद्धा, पण ती मुलांपर्यंत पोहोचलीच नाहीत. कारण पालकांना मराठी बडबडगीतांपेक्षा इंग्रजी गाणी जवळची वाटू लागली आहेत. हाच मुद्दा घेऊन सदर अंकामध्ये ज्येष्ठ साहित्यिक भरत उपासनी यांनी लिहिलेली बडबडगीते समाविष्ट करण्यात आली आहेत.
आपल्याला जास्त काही करायचं नाहीये, आपल्या पाल्याला योग्य संस्कार द्यायचे आहेत. ग्लोबलायझेशनसोबतच आपली मातृभाषा सुद्धा टिकवून ठेवायची आहे. ही तेव्हाच टिकेल, जेव्हा आपण ती आपल्या मुलांसोबत बोलू, आपण आपल्या पाल्यांना पु.लं., अत्रे यांची ओळख करून देऊ. आपण त्यांच्यात मराठी वाचनाची गोडी निर्माण करू.
लोभ असावा.
धन्यवाद!
अभिषेक ज्ञा. ठमके
संपादक