मी आहे सलोनी!
भरत उपासनी
आमच्या घरातलं मी एक छोटं बाळ आहे.माझ्या कानावर घरातले काही शब्द पडतात.माझ्याकडे बघून घरातले सगळे लोक मला निशिगंधा म्हणतात.मग मला कळलं की ते माझं नाव आहे.पण माझा तो दादा आहे ना त्याला माझं नाव म्हणताच येत नाही.तो माझ्याजवळ येतो,माझी पप्पी घेतो आणि म्हणतो मिशिगंधा.मग सगळेच त्याला हसतात आणि म्हणतात मि ऽ शि ऽ गंऽ धा ऽ !
माझ्या आजीने मला वाढदिवसानिमित्त कानात बघा कसा झुब्बा दिलाय.बोटात छोटी अंगठी दिली आणि खेळणी तर कित्ती कित्ती आणली आहेत.आजी मला म्हणते मा ऽ ऊ ऽ ! आजी मला बोटाला धरून उभी करते आणि म्हणते कशी" डिगी डिगी लाला , गाजर पाला , माऊ उभी राहिली , आम्ही नाही पाहिली ! "
माझ्या झोक्यासमोर ती खिडकी आहे ना , तिथे रोज एक चिऊताई येते.मग आजी काय करते माहिती आहे? तिच्या डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा बोट नाचवते आणि गाणं म्हणते, कोणतं सांगू ? "चिव चिव ये,काव काव ये,चारा खा,पाणी पी, भुर्रर ऽ दिशी उडून जा ऽ !" आजीने गाणं म्हणायला सुरुवात केली की मी सुद्धा माझ्या हातावर बोट नाचवते , पण ती चिवडी मोठ्ठी भामटी आहे ऽ मी बोट नाचवला की येत नाही ,तिला यायचं तेव्हाच येते.मला गाणं म्हणता येत नाही ना अजून , मी छोटी आहे ना अजून , म्हणून येत नसेल ती ऽ ! चिवडटली चावडटली जा मी आता तुझ्याशी बोलणारच नाही ऽ !
आई मला काखेत धरून नाचवते आणि म्हणते " नाचू नाचू गोविंदा ऽचल घागरीच्या छंदा ऽ एक पाय नाचू रे ऽ !मग मी ठुमुक ठुमुक नाचायला लागते.मी अशी नाचायला ठुमकायला लागली की आजोबा म्हणतात , "ठुमक चलत रामचंद्र , बाजत पैंजनिया ऽ ठुमक चलत रामचंद्र ऽ !
काल दादा त्याच्या मित्रांना सांगत होता की हे बाळ आम्ही डॉक्टरांच्या दवाखान्यातून विकत आणलंय ! मला म्हणायचं होतं की," तुलाच आणलं असेल विकत ! पण मला अजून जास्त बोलता येत नाही ना म्हणून बसले गप्प! मनात म्हटलं थांब ऽ तुला दाखवतेच आता माझा हिसका ऽ! दादाची मग मी संध्याकाळी फजितीच केली,कशी माहितेय? ती किनई कानातली गमाडी गम्मत जमाडी जम्मत आहे ,मी तुम्हाला सांगेन पण तुम्ही कुणाला सांगू नका हं ! म्हणजे त्याचं काय झालं , दादाने मला संध्याकाळी त्याच्या मांडीवर घेतलं खेळवायला ! आणि मला खेळवता खेळवता म्हणू लागला , " ओले ओले बाला आश्यं ललायचं नश्तं !"
तेवढयात मी काय केलं , ह्ळूच त्याच्या नव्या कपडयांवर शू ऽऽ केली , मग बसला एक तास बाथरूममध्ये अंघोळ करत !ह्या मोठ्ठ्या लोकांना वाटतं जसं मला काही कळतच नाही !
ह्या घरातले ते ऐटदार गृहस्थ आहेत ना , ते माझे बाबा बरं का ! आई मला घट्ट धरून बसते आणि मग बाबा आम्हाला त्यांच्या ते हिरो होंडा का काय ते म्हणतात ना त्याच्यावरून फिरवून आणतात. ह्या बाबांची गम्मत सांगायची राहिलीच की !बाबांनी मला एक नवीनच नाव ठेवलंय , ते मला म्हणतात , 'सलोनी भोपुड ऽ '. बाबा आजोबांना म्हणाले, " तुम्ही पण हिला' सलोनी भोपुड'असं म्हणत जा !"
आजोबा म्हणाले,पण नेमका ह्याचा अर्थ काय?" ह्यावर बाबा म्हणाले, "कोणत्याच डिक्शनरीत ' सलोनी भोपुड ' ह्या शब्दाचा अर्थ सापडणार नाही पण मी सांगतो म्हणून म्हणा! आताशा मला कोणी सलोनी म्हटलं की मी पटकन त्यांच्याकडे पहाते आणि मनातल्या मनात ठरवते की आज ह्यांची फजितीच करायची, दादाची केली तशी,कारण ऽऽ आहेच मी मुळी बाबांची लाडकी सलोनी भोपुड अशी ऽऽऽ !