वृक्षवल्ली जीवन आमुचे...!
कु.पुजिता संजय उपासनी
मित्रहो, झाडे लावा झाडे जगवा ह्या ब्रीदवाक्याची आपण फक्त घोषणा करत आलो. आता इथून पुढे आपणच आपले आयुष्य कमी किंवा जास्त करू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, ते कसे काय? मी सांगते, कसे काय ते ! हे बघा मित्रांनो मैत्रिणींनो,आपण आजपर्यत म्हणजेच इयत्ता पहिली ते चौथी पर्यतच्या काळात फक्त एक झाड डोक्यावर घेवून शाळेच्या आजूबाजूला ओरडत फिरायचो, "कावळा म्हणतो काव काव, एक तरी झाड लाव !" पण हे फक्त ओरडून तरी कसे बरे चालेल ? तर नाही,फक्त ओरडायचे नाही, आता प्रत्यक्षात कृतीच करायची.
रामदास स्वामी असे म्हणून गेले की, "जो दुस-यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला !" आपण ह्या घोषणा देवून झाडे लावण्याचे काम इतर लोकांवर सोपवतो पण अशाने काही होणार नाही, कारण आपण इतरांना सांगतो की, झाडे लावा पण आपणच लावत नाही.अशा आपल्या वागण्याने पर्यावरण बिघडते आणि आपले जीवन धोक्यात जाते. दिवसेंदिवस आपले जीवन असे धोक्यात घालण्याऐवजी जर तुम्ही आम्ही आपण सर्वांनीच झाडे लावली तर त्याचा आपल्याला उपयोग नाही का होणार? म्हणूनच मित्रानो मैत्रिणींनो झाडे लावा. आपण सर्वांनीच झाडे लावू झाडे जगवू.
तुम्ही सारे हे विसरू नका की जर एखाद्याने पुढाकार घेवून एक काम सुरु केले तर दुसरे लोकही सहकार्य केल्याशिवाय राहत नाही. आपण पुढाकार घेवून झाडे लावू या, इतर लोक मदतीला आपोआप येतील.
"चला लावू या झाडे आपण, वाचवू या आपले जीवन
एक एक झाड लावत, कण आयुष्याचे वेचत
उगवू या झाडे आपुली, शुध्द करू या जीवने लोकांची
झाडे लावू, झाडे जगवू, पर्यावरण आपुले आपण वाचवू ! "
आपण जीवन वाचवू म्हणजे ते कसे ? तुम्हाला हे माहीत आहे का, झाडे आपल्यासाठी प्राणवायू सोडतात. जर आपल्याला प्राणवायूच मिळाला नाही तर आपण जगू का ? झाडे आपल्याला लावलीच पाहिजेत. म्हणूनच झाडे लावा, पर्यावरण वाचवा,पर्यायाने आपले स्वतःचे जीवन वाचवा.