Android app on Google Play

 

जून २६ - परमार्थ

 

ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते , त्या झाडाला आपण पाणी घालतो , त्याची मशागत करतो , त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरवितो . परंतु जे झाड वाढू नये असे वाटते , किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही , त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो . तसे , जेणेकरुन परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल , त्याची जोपासना करावी . देहाकडे , विचारांकडे , विषयांकडे दुर्लक्ष करावे , म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल . ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना , त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालावे लागते , त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा ; तो जितका गुप्त राहील तितका चांगला . त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते . म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत , परंतु अत्यंत आवडीने करावा . झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कुणी रोज उकरुन पाहात नाही , त्याप्रमाणे अनुभवाच्या , प्रचीतीच्या मागे लागू नका ; त्यामुळे प्रगती खुंटेल .

हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात ; कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले . परमार्थात नियम थोडाच करावा , पण तो शाश्वताचा असावा ; म्हणजे , जेणेकरुन भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा , आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा . जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो . हा मार्ग फार थोरांचा आहे . ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो ; त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षेसुद्धा जातील , पण त्याच्या देहाला काही होणार नाही . आपल्यासारख्याला साधनांत साधन म्हणजे भगवंताचे नाम ; दानांत दान म्हणजे अन्नदान ; आणि उपासनांत उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय ; या तिन्हींमुळे देहाचा विसर पडतो . म्हणून शक्य तो या तीन गोष्टींची कास धरा . मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढविण्याकडे असते . द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे . साधे मधमाश्यांचे उदाहरण घ्या . त्या अनेक झाडांवरुन मध गोळा करतात आणि नंतर तो पोवळ्यात एकत्र करतात . असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे ! अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत , म्हणजे एक राम , पाहायला शिकावे ; आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वत : मध्येच राम पाहून , प्रत्येक कृती ही रामाची समजावी . स्वत : मध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही . तेव्हा स्वत : चा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही , आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानेच होईल . म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा .