जून ३ - परमार्थ
ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली , त्याला शरण जावे . त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पाहावे . कर्तेपण टाका म्हणजे शरण जाता येते . माझेपणाने मिरविता आणि अभिमान कायम ठेवता , मग भगवंताला शरण कसे जाता येईल ? आपण संताच्या दर्शनाला जातो , आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो ; मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का ? पोराबाळांकरता , बायकोकरता , संतांकडे नाही जाऊ . संतांनी नामस्मरण करायला सांगितले , परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची , नामस्मरणावरची , श्रध्दा उडते . म्हणजे मी विषयाकरिता नाम घेतो असेच झाले ! विषय सुटावेत असे वाटते , पण ते सुटतच नाहीत . याचे कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते . संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोर घेऊन आडवी येते ; तिला दूर सारुन निघाला , पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते ! माणूस व्यसनाकरितां हे सर्व करतो , परंतु परमार्थाकरिता विषय आणि मोह दूर करुन साधन कर म्हटले , तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात . चोवीस वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही , मग परमार्थ मात्र दोन वर्षांत साध्य व्हावा असे कसे म्हणावे ?
शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे . परमार्थ हा समजुतीचा आहे , उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही . बद्रीनारायणाची यात्रा करुनही तो साधणार नाही . त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल . काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात , तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे . तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे . खेळात काही बाह्य साधन तरी लागते , पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते . परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे . आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल , तितका आपल्याला फायदेशीर आहे . जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही . खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे , हा तर फार मोठा घात आहे . अंतर्यामी स्थिर होणे , स्वस्थता येणे , सावधानता ठेवणे , दगदग सोडणे , हाच परमार्थ होय . सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे , याचेच नाव परमार्थ . ‘ जग काय म्हणेल ’ म्हणून वागणे याचे नाव व्यवहार , आणि ‘ भगवंत काय म्हणेल ’ म्हणून वागणे हाच परमार्थ .