Android app on Google Play

 

जून १ - परमार्थ

 

दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध ; पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले , तो मुक्त समजावा . ‘ देही मी नव्हे ’ हे ज्याला समजले तो मुक्तच . सत्यज्ञान करुन घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे . बद्धदशा आमची आम्ही निर्माण केली . काळजी , तळमळ आणि दु :ख ही बद्धपणाची लक्षणे होत , तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे . जागे होणे म्हणजे मुक्तदशेला येणे आहे . माझे माझ्याजवळच आहे , पण ते ठाऊक नाहीसे झाले आहे . भगवंताला विसरल्याने ‘ मी देही ’ असे म्हणू लागलो . देह तर माझ्या ताब्यात नाही , तेव्हा मी देही नाही हे सिध्द झाले . आपण कर्तेपण आपल्याकडे घेतो , आणि त्याबरोबर सुखदु :खही आपल्याकडे येते . मला सुख नाही आणि दु :खही नाही असे ज्याला वाटेल , तो मुक्त समजावा .

कर्तेपण घातुक असते . मी एवढा मोठा वाडा बांधला , प्रपंच चांगला केला , असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो , तर संन्यासी मठाचाच अभिमान धरुन बसतो ! म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही . हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही , याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो . भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो . म्हणून , भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे , आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे . भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते , तो विषय समजावा . विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच , आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ .

फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय ; पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते . आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ . हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे , याचेच नाव अनुसंधान होय . समजा , आपण एखादे चांगले पुस्तक वाचीत बसलो आहोत , इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली ; त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते ! ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते , त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे . प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे . अनुसंधानाचा अभ्यास करावा . भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते . मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा .