जून २ - परमार्थ
खरोखर , जगात आणि लौकिकांत आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही . भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल . आपण अडाणी झाल्याशिवाय , म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय , परमार्थ साधत नाही . मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते , त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थतीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहाण्यासाठी लागणारे समाधानही तो आपल्याला देत असतो . ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे . जिथे असमाधान फार , तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो . याच्या उलट , जिथे खरे समाधान आहे , तिथे चांगल्या शक्ती मदत करतात . आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही . देहाचा मनाशी संबंध आहे , आणि मनाचा ह्रदयाशी संबंध आहे ; म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे , म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य़ वाढेल .
स्वार्थ सुटताना पहिल्या -पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही . जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल . पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करुन शिवाय नि :स्वार्थी राहील . खरोखर , परमार्थ हे एक शास्त्र आहे ; त्यामध्ये सुसूत्रपणा आहे . व्यवहार न सोडावा ; पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते , म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे . भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे . भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ . परमार्थाला डोके शांत पाहिजे . एका गृहस्थाला सगळेकडे रामाची मूर्ती दिसू लागली . झाले ! त्याला वाटले की देव आपल्याला भेटला . पण हे काही खरे भगवंताचे दर्शन नव्हे . तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे . परमार्थाची काळजी करु नये ; ती काळजीच प्रगतीच्या आड येते . वय वाढू लागले की आपले सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात , तसेच परमार्थाला लागणार्या गुणांचे आहे . आपण साधन करीत असताना , आपली प्रगती किती झाली हे सारखे पाहू नये . समजा , आपण आपल्या परसात एक झाड लावले , आणि ते किती वाढले हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून आपण जर पाहू लागलो , तर ते झाड वाढेल का ? अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे . मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरुन आणि दृष्टीवरुन ओळखता येते .