Android app on Google Play

 

जून १४ - परमार्थ

 

भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा ; भगवंत जोडणे हाच एक धर्म . अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोहोचत . दानधर्म केला , धर्मशाळा बांधल्या , हे सर्व नाम होण्याकरिताच जर केले , तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला ? भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो . बाभळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील ? मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत . शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म . मी भगवंताच्या हातचे बाहुले आहे असे समजावे . ‘ राम कर्ता ’ असे म्हणावे . म्हणजे , देवाजवळ शरणबुद्धी धरावी .

भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते . ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही . किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही . एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय ? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो . भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा , आणि जे फळ मिळेत त्यात समाधान मानावे . व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते , तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते . परमार्थ करणार्‍या माणसाने कोणाचेही अंत : करण दुखवू नये .

परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसाचा नाही , तसा तो बावळ्या माणसाचाही नाही . व्यवहारात कुणाला फसवू नये , आणि कशाला भुलू नये . आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी . लोकांकडून न फसण्याइतकेच आपण व्यवहारी असावे . आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल , त्या मानानेच देवघेव करावी . व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे .

‘ कोणत्याही परिस्थितीत मी राहीन ’ असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही . आपण श्रीमंतांचा द्वेष करु नये आणि गरिबांना कमी लेखू नये . अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे . प्रत्येकाला खायलाप्यायला भरपूर मिळाले पाहिजे ही संपत्तीची समान वाटणी होय . मोबदला न देता आपण पैसा घेतला , तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते . काय गंमत आहे बघा , इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो . पण तो पैशाचे वचन देतो सहज , आणि ते मोडतोही सहज . तेवढेच वचन पाळण्यात तो कुचराई करतो . पैसा नसून अडते आणि तो असून नडते , अशी आपली परिस्थिती आहे . संन्याशाने एक दिवसाचा संग्रह करावा , गृहस्थाने तीन दिवसांचा संग्रह करावा . आपल्याजवळ तीन दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करु नये .