जून २५ - परमार्थ
राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत , त्यांमध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन हेही एक आहे . परंतु कोणत्याही ग्रंथाचे अगर पोथीचे वाचन करताना , केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करु नये . अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार ; तसेच , जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा . आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी . भाराभार वाचले आणि कृती केली नाही , तर काय उपयोग ? चार मैलांचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल ? एक मैल रस्ता चालावा , म्हणजे पुढचे दिसेल ; जसजशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल . परमार्थाचेही असेच आहे . बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसे होईल ? त्याचप्रमाणे , आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर कसे होईल ? सदगुरुची आज्ञा पाळावी , साधन करु लागावे , म्हणजे सर्व काही होते . जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का ?
खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे ; प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे . आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे . पण याच्या उलट , आपला परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे . कुंपणाने शेत खावे तसे आपले झाले आहे . शेताला कुंपणाची जरुरी आहे ; नाहीतर ढोरे आत येऊन शेत फस्त करतील . पण कुंपणच जर बेसुमार वाढले , तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणले पाहिजे .
ज्याने व्यवहार तपासून केला , त्याला परमार्थ साधलाच . परमार्थ हा साखरेसारखा आहे . आपण साखरेचे कारले जरी केले तरी ते खायला गोडच लागते , तसे प्रपंचातसुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच असतो . परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करुन पाहावे ; आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले , तर मात्र केल्याशिवाय राहू नये .
पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड , त्याचप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे . सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे . पाया म्हणजे काही घर नव्हे , परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे , हे देखील तितकेच खरे . आपण स्वत : च्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा ; आणि आपण दुसर्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा . भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ , आणि ज्याची वृत्ती सुधारुन भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला .