Get it on Google Play
Download on the App Store

*संघ 3

अस्सजि-

ये धम्मा हेतुप्पभवा हेतुं तेसं तथागतो आह।
तेसं च यो निरोधो एवंवादी महासमणो१।। (१ ही गाथा फार प्रसिद्ध असून प्राचीन शिलालेखांत पुष्कळ ठिकाणीं सांपडते.)

कारणापासून उत्पन्न झालेले जे पदार्थ (पंचस्कन्धादिक दु:खद पदार्थ) त्यांचें कारण तथागतानें सांगितलें आहे, आणि त्यांचा निरोध कसा होतो हेंहि सांगितलें आहे, हेंच महाश्रमणाचें मत होय.

हें समजल्यावर सारिपुत्ताच्या अंत:करणांत एकदम प्रकाश पडला. हें वर्तमान त्यानें मोग्गल्लानाला कळविलें. तेव्हां ते दोघेहि बुद्धापाशीं गेलें आणि त्यांनी भिक्षुसंघात प्रवेश केला. त्यांजबरोबर संजय परिव्राजकाचे आणखीहि २५० शिष्य बुद्धाचे शिष्य झाले. सारिपुत्त व मोग्गल्लान हे दोघे पुढें अग्रश्रावक (बुद्धाचे प्रमुख शिष्य) झाले.

बुद्ध भगवंताच्या आगमनानें राजगृह नगरींत जिकडेतिकडे गडबड उडून गेली होती. आज हा बुद्धाचा शिष्य झाला, उद्यां हे परिव्राजक बुद्धाचे शिष्य झाले, हाच काय तो त्या वेळी लोकचर्चेचा विषय होऊन बसला होता. कांहीं लोक तर उघडपणें बुद्धास दोष देऊं लागले. हा श्रमण गोतम आमचा देश अपुत्रक करण्यासाठी आला आहे कीं काय? असें ते म्हणूं लागले. भिक्षु दृष्टीस पडले तर ते असें म्हणत असत:-

आगतो खो महासमणो मागधान गिरिब्बजं।
सब्बे सजन नत्वान कंसु दानि नांयस्सति:।।


हा महाश्रवण मागधांच्या गिरिव्रज (राजगृह) नगरास आला. हा सर्व संजयाच्या शिष्यांना घेऊन गेला. आतां हा कोणास नेणार?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(२ राजगृह नगरांस गिरिव्रज असें म्हणत असत. हें शहर डोंगराच्या मध्यभागीं वसलें होते, म्हणून हें नाव पडलें असावें.)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हें वर्तंमान भिक्षुंनी भगवंतास कळविलें. तेव्हां तो म्हणाला, ‘‘भिक्षु हो, हा लोकप्रवाद कांहीं फार दिवस टिकावयाचा नाहीं, एका आठवडय़ांतच हा प्रवाद नाहींसा होईल. जे तुम्हांला या (वर दिलेल्या) श्लोकानें दोष देतील त्यांनां तुम्ही या श्लोकानें उत्तर द्या-

नयन्ति वे महावीरा सद्धम्मेन तथागता।
धम्मेन नीयमानानं का उस्सुय्या विजानतं।।


महाशूर तथागत लोकांनां सद्धर्मानें नेत असतात. ते धर्मानें लोकांना वळवितात, हें जाणणारांनी त्यांचा मत्सर कां करावा?’’

पहिल्या गाथेनें लोकांनीं भिक्षुंस दोष दिला असतां या गाथेंने भिक्षु त्यांस उत्तर देत असत. धर्मानेंच शाक्यपुत्रीय१ (१ बौद्ध संघांतील भिक्षुंस शाक्यपुत्रीय श्रमण म्हणत असत.) श्रमण लोकांस वळवितात, अधर्मानें वळवीत नाहींत, हें जेव्हां लोकांस समजलें तेव्हां त्यांनी भिक्षूंस दोष देणें सोडून दिलें. एका आठवडय़ांतच तो लोकप्रवाद नष्ट झाला.