Get it on Google Play
Download on the App Store

*धर्म 1

धर्म

आलोकस्तिमिरे विपव्दिषमणि: पाते करालंबनं
यात्र्चाकल्पतरूर्जगज्जयरथं पाथेयमन्ते पांथ।
दु:खव्याधिमहौषधं भवभयोद् भ्रांताशयाश्र्वासनं
तापे चंदनकाननं स्थिरसुहृद्धर्म: सतां बांधव: ।।


धर्म हा अंधकारांत प्रकाश आहे; विपत्तिरूपी विषाचा नाश करणारा मणि आहे; पडलेल्याला हात देणारा आहे; इच्छेचे फल देणारा हा कल्पतरू आहे; जगताचा जय करणारा हा जणूं रथ आहे; परलोकप्रवासाची शिदोरी; दु:खरूपी व्याधीचें महौषध; भवभयानें भ्रांत झालेल्या अंत:करणाला आश्वासन; दाह झाला असतां चंदनवन; हा कायमचा मित्र आहे; आणि हा सज्जनांचा (खरा) बांधव आहे.

-(क्षेमेंद्रमहाकवि अवदानकल्पलता.)

*    *    *
सब्बपापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा।
साचत्तपरियोदपनं एतं बुद्धान सासनं।।१।।

सर्व पापांपासून विरत होणें, (सर्व) कुशलाचा (पुण्याचा) संचय करणें, आणि स्वाचित्ताचें संशोधन करणें हें बुद्धाचें अनुशासन होय. (धम्मपद.)

बुद्धानें उपदेशिलेल्या धर्ममार्गाचा सारांश या गाथेंत सांगितला आहे. ‘सर्व पापापासून विरत होणें’ म्हणजे शीलाचें रक्षण करणें; ‘कुशलाचा संचय करणें’ म्हणजे समाधि साध्य करणें; आणि ‘स्वचित्ताचें संशोधन करणें’ म्हणजे प्रज्ञा संपादन करणें होय. अर्थात शील, समाधि आणि प्रज्ञा या त्या धर्ममार्गाच्या तीन मुख्य पायर्‍या होत, यांनांच अनुक्रमे ‘अधिशीलाशिक्षा’ ‘अधिचित्तशिक्षा’ आणि ‘अधिप्रज्ञाशिक्षा’असें म्हणतात. या तीन शिक्षांत सगळ्या बौद्धधर्माचा अंतर्भाव होतो. गेल्या व्याख्यानांत सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाच्या आठहि अंगांचा या तीन शिक्षांतच समावेश होतो. सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्त आणि सम्यक् आजीव या तीन अंगांचा अधिशीलशिक्षेत समावेश होतो;  सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति आणि सम्यक् समाधि या तीन अंगांचा अधिचित्तशिक्षेंत समावेश होतो; व सम्यक् दृष्टि आणि सम्यक् संकल्प या दोन अंगांचा अधिप्रज्ञाशिक्षेंत समावेश होतो.

आजच्या या व्याख्यानांत बुद्ध, धर्म व संघ या रत्नांपैकी दुसर्‍या रत्नाची म्हणजे धर्माची माहिती सांगावयाची ती मी वरील शिक्षात्रयीच्या द्वारें सांगणार आहें. तेव्हां आतां अधिशीलशिक्षा किंवा शील म्हणजे काय याचा प्रथमत: विचार करूं. बौद्ध समाजांतील पुरुषांचे गृहस्थ, उपासक, श्रामणेर आणि भिक्षू असे चार भेद आहेत. त्याचप्रमाणें गृहिणी, उपासिका, श्रामणेरी आणि भिक्षुणी असें स्त्रियांचेहि चार वर्ग केले आहेत. पैकीं भिक्षुणीचा आणि श्रामणेरीचा वर्ग आजला अस्तित्त्वात नाहीं. बाकी सहा वर्ग ब्रह्मदेश, सिलोन वगैरे देशांतील बौद्ध लोकांत आढळतात. यांतील भिक्षूंला आणि श्रामणेरांला लागू पडणारा जो अधिशीलशिक्षेचा भाग त्याचा आम्हांस येथें विचार करण्याची जरुरी वाटत नाहीं. एक तर तसें केल्यानें आजच्या विषयाचा फारच विस्तार होणार आहे; व दुसरें त्यापासून आपणाला तादृश फायदा होण्यासारखा नाहीं. तथापि ज्यांची तशीच जिज्ञासा असेल त्यांनी विनय ग्रंथाचें “Sacred Books of the East” मध्यें प्रसिद्ध झालेलें भाषांतर वाचावें.

गृहस्थ आणि गृहिणी यांनां लागू पडणार्‍या शीलाचे इतर वर्गानां लागू पडणार्‍या शीलाप्रमाणेंच विहितशील (चारित्तसील) आणि निषिद्धशील (वारित्तसील) असे दोन भेद आहेत. बुद्धानें करण्यास सांगितलेल्या गोष्टी करणें हे विहितशील;  व वर्ज्य करण्यास सांगितलेल्या गोष्टी वर्ज्य करणें हें निषिद्धशील होय.

मंगलसुत्त, सिगालसुत्त इत्यादि सुत्तांतून गृहस्थांनी आणि गृहिणींनीं पाळण्यासाठी बुद्ध भगवंतानें कांही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांपैकीं, विधिशीलाची आपणांस नीट कल्पना व्हावी म्हणून मंगलसुत्तांतील गाथा येथें देत आहें.