Get it on Google Play
Download on the App Store

*धर्म 13

समाहितो यथभूतं पस्सति पजानाति

'ज्याला समाधिलाभ जाला तोच यथार्थतया पाहतो व जाणतो.' या वचनानुरोधानें अधिचित्तशिक्षा पुरी झाल्यावर योग्यानें प्रज्ञालाभासाठीं प्रयत्न केला पाहिजे. पहिल्या व्याख्यानांत सांगितलेल्या चार आर्यसत्याचें- दु:ख, दु:खसमुदय व दु:खनिरोध दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा (मार्ग) यांचें- योग्यानें प्रथमत: यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेतलें पाहिजे, दु:ख सत्य हें केवळ परिज्ञेय म्हणजे जाणण्यास योग्य आहे. दु:खसमुदाय म्हणजे तृष्णा ही त्याज्य आहे. दु:खनिरोध म्हणजे निर्वाण हे ध्येय आहे, आणि दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग हें सत्य अभ्यसनीय आहे. तेव्हां योग्यानें परिज्ञेय सत्य केवळ जाणावें, त्याज्याचा त्याग करावा, ध्येयाचा साक्षात्कार करून घ्यावा, व अभ्यसनीयाचा अभ्यास करावा.

अविद्येपासून संस्कार, संस्कारांपासून विज्ञान, विज्ञानापासून नामरूप, नामरूपापासून षडायतन, षडायतनापासून स्पर्श, स्पर्शापासून वेदना, वेदनेपासून तृष्णा, तृष्णेपासून उपादान, उपादानापासून भव, भवापासून जाति (जन्म), जातीपासून जरा, मरण, शोक, परिदेवन, दु:ख, दौर्मनस्य, उपायास उत्पन्न होतात. या कारणपरंपरेला प्रतीत्यसमुत्पाद असें म्हणतात. जरामरणाचें कारण जन्म, जन्मांचें कारण भव म्हणजे कर्म, कर्माचे कारण उपादना म्हणजे लोभ, लोभाचें कारण तृष्णा, तृष्णेचें कारण वेदना म्हणजे सुख, दु:ख, उपेक्षा या तीन अवस्था, वेदनांचें कारण स्पर्श म्हणजे इंद्रियविषयसंयोग, स्पर्शाचें कारण षडायतन म्हणजे मन आणि पांच ज्ञानेंद्रियें, षडायतनाचें कारण नामरूप, नामरूपाचें कारण विज्ञान म्हणजे जाणीव, विज्ञानाचें कारण संस्कार म्हणजे प्रवृत्ति, संस्कारांचें कारण अविद्या म्हणजे अयथार्थ ज्ञान. अयथार्थ ज्ञानाचे बौद्धमताप्रमाणें संक्षेपत: तीन प्रकार आहेत: (१) जग अनित्य म्हणजे रुपांतर पावणारें- असतां तें नित्य आहे, असें मानणें; (२) आत्मा म्हणून अविनाशी, अविकारी असा पदार्थ नसतां तो आहे असें मानणें; (३) संसार दु:खमय असतांना त्यांतच सर्व सुख आहे असें मानणें. या प्रकारचें अयथार्थ ज्ञान सर्व संसारदु:खाचें आद्यमूळ होय. चार आर्यसत्यांच्या ज्ञानानें या अविद्येचा नाश होतो; आणि अविद्येचा नाश झाला म्हणजे तिच्यावर अवलंबून असलेल्या संस्कारांदिकांचा आपोआप नाश होतो; अविद्या उत्पन्न होण्यापूर्वी प्रश्नण्यांची काय स्थिती होती हें कोणाच्यानेंहि सांगतां येणार नाहीं हा सगळा संसार अनादि आहे, अर्थात अविद्याहि अनादि आहे. बुद्ध भगवान् म्हणतो:-

अनमतग्गोयं  भिक्खवे संसारो, पुब्बा कोटि न पञ्ञायति, अविज्जानीवरणानं सत्तानं तण्हासञ्ञोजनानं  संधावतं संसरतं।।

भिक्षुहो, हा संसार अनादि आहे. अविद्येनें आच्छादिलेल्या आणि तृष्णेनें बद्ध झालेल्या संसारचक्रांत सांपडलेल्या प्राण्यांची पूर्वस्थिति काय होती, हें कांही समजत नाही. (संयुत्तनिकाय.)

आर्य अष्टांगिक मार्ग जसा साधनमार्गात दोन्ही अंत टाळून मध्यमवर्ती आहे, तसा हा प्रतीत्यसमुत्पाद तत्त्वज्ञानमतांत मध्यमवर्ती आहे. बुद्धाच्या वेळी अस्तिवादी म्हणजे आत्मा शाश्वत वस्तु आहे असें म्हणणारे कांही तत्त्ववेत्ते होते. दुसरे नास्तिवादी म्हणजे आत्मा अशी कांहींच वस्तु नाहीं असें म्हणणारें होते. या दोहोंच्यामधील मत प्रतीत्यसमुत्पाद हें आहे. कारण त्याप्रमाणें आत्मा शाश्वत किंवा अशाश्वत पदार्थ नसून कार्यकारण नियमानें बदलणारा आहे. इदं सति इदं होति इदं असति इदं न होति. कारण असले तर कार्य होतें, कारण नसेल तर कार्य होत नाहीं. बुद्ध भगवान् कात्यायनाला म्हणतो:-

सब्ब अत्थीति खो कच्चान अयमेको अंतो। सब्बं नत्थीति अयं दुतियो अंतो। एते ते उभो अंते अनुपगम्म मज्झेन तथागतो धम्म देसेति अविज्जापच्चयासंखारा ।।पे।।