Get it on Google Play
Download on the App Store

प्रस्तावना ** 2

बौद्ध धर्म हा विषय अत्यंत विस्तृत; या छोट्या पुस्तकात त्याचा अत्यंत अल्प असा सारांशच येणार व तो काही स्थली दुर्बोध राहाणारच. तरी पण ग्रंथकर्त्याने सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा मोठ्या कुशलतेने संग्रह केला आहे व त्या होईल तेवढ्या सुगम करून वाचकांपुढे मांडल्या आहेत; व काही काही गोष्टींत तर बौद्धधर्मांच्या स्वरुपाची कल्पना या लहानशा पुस्तकाच्या द्वारे जशी येईल तशी पाश्चात्यांनी लिहिलेल्या मोठमोठ्या ग्रंथाच्या वाचनानेही येणार नाही, असे जरी आहे, तरी हे पुस्तक पडले अत्यंत अल्पच; याच्या वाचकांस बौद्ध धर्माविषयीच्या पुष्कळ गोष्टी अज्ञात व अस्पष्ट राहणारच. त्यांच्या मनात जी जिज्ञासा उत्पन्न होईल ती तृप्त करण्याकरिता प्रो. धर्मानंद अधिक विस्तृत ग्रंथ लवकरच लिहितील अशी मला आशा आहे. पण याहूनही उत्तम गोष्ट म्हणजे वाचकांनी प्रो. धर्मानंदांसारखा सर्वस्वी योग्य मध्यस्थ शिक्षक मिळत असला, तरीही पण दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी न पिता स्वत: पालिभाषेचे ज्ञान प्राप्त करून घेऊन बौद्ध धर्माचे ज्ञान प्रत्यक्ष करून घ्यावे ही होय. आमच्या युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात पालिभेषेचा अंतर्भाव आता झालेलाच आहे. तेव्हा या भाषेचे अध्ययन करण्यास सुरुवात करावी म्हणून मी आमच्या तरुण मंडळीला आग्रहाची विनंती करितो; व अशा रीतीने, विचारास पटणारा आत्मविजय हा ज्याचा पाया व सार्वत्रिक व अप्रतिहत प्रेमभाव हा ज्याचा कळस अशा कल्याणप्रद बौद्ध धर्माचे ज्ञान आमच्या देशात वाढून प्रो. धर्मानंद म्हणतात याप्रमाणे “या रत्नाचा उज्ज्वल प्रकाश आमच्या अंत:करणावर पडून आमचे अज्ञान नष्ट होईल, आमच्यातील भेदभाव आम्ही विसरून जाऊ व पुन: मनुष्यजातीचे हित साधण्यास समर्थ होऊ अशी आशा आहे.”

वा. अ. सुखठणकर
मुंबई, ता. ४ एप्रिल १९१०.


दुसर्‍या आवृत्तीची प्रस्तावना

श्रीमंत महाराज श्रीसयाजीराव गायकवाड यांच्या आश्रयाखाली १९१० सालच्या फेब्रुवारी महिन्यात बडोदे येथे मी पाच व्याख्याने दिली. त्यांपैकी ही तीन श्रीमंत महाराजसाहेबांच्याच आश्रयाने त्या सालच्या एप्रिल महिन्यात पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आली. यांची ही दुसरी आवृत्ती महाराष्ट्र वाचकांसमोर आणण्याचे सर्वं श्रेय मासिक मनोरंजनाचे उत्साही संपादक श्रीयुत दामोदर रघुनाथ मित्र यांस आहे. पहिल्या आवृत्तीप्रमाणे याही आवृत्तीस उदार आश्रय देऊन आमचे देशबांधव श्रीयुत मित्र यांचा प्रयत्न सफल करतील अशी आशा बाळगतो.

धर्मानंद कोसंबी.
मुंबई,
ता. ७ मे १९२४