बुद्ध 10
परंतु जसजसा बुद्ध जवळ येत चालला तसतसा या पांच भिक्षूंचा बेत ढासळत गेला. त्यांपैकी एकानें उठून आसन मांडलें, दुसर्यानें पाय धुण्यास पाणी तयार केलें. बाकीच्यांनी सामोरे येऊन बुद्धाचें भिक्षापात्र आणि चीवर (भिक्षुवस्त्र) घेतलें व त्याचा सन्मान केला. बुद्धानें आपणास धर्मज्ञानाचा साक्षात्कार झाल्याचें त्यांना सांगितलें, परंतु तें त्यांनां खरें वाटेना. शेवटी आषाढपौर्णिमेच्या दिवशी भगवन्तानें त्यांस उपदेश केला, तो असा:-
“भिक्षु हो, प्रव्रजितानें या दोन अंतांचें सेवन करूं नये. ते दोन अंत कोणते? चैनीचा उपभोग घेत पडणें हा एक अंत. हा हीन आहे, ग्राम्य आहे, अज्ञजनसेवित आहे, अनार्य आहे, अनथावह आहे. देहदंडण करणें हा दुसरा अंत. हाहि दु:खकारक आहे, अनर्थावह आहे. म्हणून या दोन्ही अंतांनां न जातां तथागतानें मध्यम मार्ग शोधून काढला आहे. हा मार्ग ज्ञानचक्षु उत्पन्न करणारा आहे, ज्ञानोदय करणारा आहे. यानेंच उपशम, अभिज्ञा (दिव्यशक्ति), संबोध (प्रज्ञा) आणि निर्वाण यांची प्राप्ति होते. हे भिक्षु हो, हा मार्ग कोणता म्हणाल तर आर्य अष्टांगिक मार्ग होय. त्याची हीं आठ अंगे:- सम्यक्, दृष्टि, सम्यक्, संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्त (कर्म), सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति, आणि सम्यक् समाधि. हा तो तथागतानें शोधून काढलेला मार्ग, ज्याच्या योगें उपशम, अभिज्ञा, संबोध, निर्वाण यांची प्राप्ति होते.१ (१ स्पष्टीकरणार्थ परिशिष्ट ३ पाहा.)”
“भिक्षु हो, दु:ख नांवाचें पहिलें आर्यसत्य तें हें:- जन्महि दु;खकारक, जराहि दु:खकारक, व्याधिहि दु:खकारक, मरणाहि दु:खकारक अप्रियांशीं समागम दु:खकारक, प्रियांचा वियोग दु:खकारक; इच्छिलेली वस्तु मिळाली नाहीं म्हणजे तेणेंकरूनि दु:ख होतें. सारांश पांच उपादनस्कंध१ (१ परिशिष्ट २ पाहा.) हे दु:खकारक होत.
“भिक्षु हो, दु:खसमुदय नांवाचे दुसरें आर्यसत्य म्हणजे जी पुन:पुन: उत्पन्न होणारी व सर्वत्र आसक्ति उत्पन्न करणारी तृष्णा. ती ही:- कामतृष्णा (ऐहिक सुखांची तृष्णा), भवतृष्णा (स्वर्गदिकांची तृष्णा), आणि विभवतृष्णा (नाहींसा होण्याची तृष्णा).
“ भिक्षु हो, दु:खनिरोध नांवाचे तिसरें आर्यसत्य म्हणजे या तृष्णेचा अशेष वैराग्यानें निरोध करणें, तिचा त्याग करणें, तिला फेंकून देणें, तिच्यापासून मुक्त होणें आणि तिजपासून परावृत्त होणें.
भिक्षु हो, दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा नांवाचे चवथें आर्यसत्य म्हणजे (वर सांगितलेला) आर्य अष्टांगिक मार्ग.”
या बुद्धाच्या पहिल्या उपदेशास ‘धर्मचक्रप्रवर्तन’ असें म्हणतात. या पांच भिक्षूंपैकीं कौडिन्य नांवाच्या भिक्षूला बुद्धाचा उपदेश त्याच वेळी पटला व तो बुद्धाचा शिष्य झाला. पुढें बाकीचे चारहि भिक्षु बुद्धाचे शिष्य झाले.
सभ्यगृहस्थ हो, येथून पुढें कुसिनारा२ (२ हे स्थान गोरखपूर जिल्ह्यांत आहे.) येथे परिनिर्वाण (देहावसान) होईपर्यंत ४५ वर्षांच्या अवधींत बुद्धानें केलेल्या परोपकाराचे वर्णन थोडक्यांतहि करण्यास अवकाश फार झाल्यामुळे सवड राहिली नाहीं. त्यांनी स्थापन केलेल्या संघाची थोडीशी माहिती मी दुसर्या एका व्याख्यानात आपणासमोर ठेवणारच आहें. आतां त्यांच्या दिनचर्येची थोडीशी हकीगत सांगून आटोपतें घेतों.