Get it on Google Play
Download on the App Store

*धर्म 8

कायभूमिं निजां गत्वा कंकालैरपरै: सह।
स्वकायं तुलयिष्यामि कदा शतनधर्मिणम्।।


या देहाच्या हक्काच्या भूमीत (स्मशानभूमीत) जाऊन मृत मनुष्यांचे हाडांचे सांगाडे पाहून, कुजून जाणार्‍या या देहाची त्या सांगाड्यांबरोबर मी कधीं तुलना करीन?

अयमेव हि कायो मे एवं पूतिर्भविष्यति।
शृगाला अपि यद्भंधान्नोपसर्पेयुरन्तिकम्।।

हें (हल्ली चांगलें दिसणारें) माझें शरीर या श्मशानांतील प्रेतांप्रमाणें इतकें कुजणार आहे कीं, त्याच्या दुर्गंधीला त्रासन कोल्हे देखील त्याजवळ येणार नाहीत!

अस्यैकस्यापि कायस्य सहजा अस्थिखंडका:।
पृथक् पृथग्गमिष्यन्ति किमुतान्य: प्रियो जन:।।

या माझ्या एका देहाचीं एकत्र असलेलीं हाडें (या श्मशानांतील हाडांप्रमाणें) निरनिराळीं होऊन पडणार आहेत! मग प्रियबांधव मला सोडून जातील यांत आश्चर्य कसलें? (कारण ते माझ्यापासून सर्वदा निराळेच आहेत.)

अशा रीतीनें शरीरांतील एखाद्या भागाचें वैराग्यपूर्ण विचारानें चिरकाळ चिंतन केले असतां पुरुषाला सुंदर स्त्रीकडे आणि स्त्रीला सुंदर पुरुषाकडे पाहून सहसा कामविकार उत्पन्न होत नाहीं. भागश: शरीराकडे पाहण्याची सवय झाल्यामुळें तो मनुष्य बाह्य कांतीला पाहून एकदम भुलत नाहीं. त्या त्या अमंगल शरीरभागांची त्याला आठवण होते, व ते त्या सुंदर कांतीच्या आड दडून बसलेले त्याला स्पष्टपणें दिसत असतात. याविषयीं विशुद्धिमार्गात एक गोष्ट आहे, ती येथें सांगितल्यांवाचून माझ्यानें राहवत नाहीं.

प्राचीन काळी सिंहलद्वीपामध्यें अनुराधपूर नांवाचे एक शहर होतें. त्याच्या आसपास पुष्कळ विहार असत. बुद्धघोषाचार्‍यानें विशुद्धिमार्ग व इतर ग्रंथ या विहारांपैकी महाविहार नांवाच्या विहारांत राहत असता लिहिले. महाविहारादिक जुन्या इमारतींचे अवशेष अद्यापि पाहण्यास सांपडतात. या शहरापासून थोडय़ा अंतरावर असलेल्या एका टेंकडीस चैत्यपर्वत म्हणत असत. तेथें एक महातिष्य नांवाचा भिक्षू राहत असें. तो एके दिवशीं भिक्षाटनासाठी अनुराधपुरास जात होता. त्याच वाटेनें आपल्या नवर्‍याशी भांडून माहेरी जाण्याकरिता एक स्त्री येत होती. त्या भिक्षूला पाहून त्याला भुलवण्यासाठी  ती मोठय़ानें हसली. त्यानें एकदम डोकें वर करून त्या स्त्रीकडे पाहिलें, तोच त्याला तिचे दांत दिसले, व त्यांनी त्याला त्याच्या नित्य चिंतनाचा विषय जो हाडांचा सांगाडा त्याची आठवण दिली. त्यामुळे त्या स्त्रीच्या अंगकांतीकडे त्याचं लक्ष्य न जातां मूर्तिमंत हाडांचा सांगाडाच डोळ्यांसमोर उभा आहे की काय असा त्याला भास झाला. तो तसाच पुढें चालता झाला. त्या स्त्रीच्या मागोमाग तिचा पति येत होता, तो याला पाहून म्हणाला :- "महाशय या मार्गानें गेलेली अलंकृत अशी सुंदर तरुण स्त्री आपण पाहिलीत काय?" तेव्हां भिक्षु म्हणाला:-

नाभिजानामि इत्थी वा पुरिसो वा इतो गतो।
अपिच अट्ठिसंघाटो गच्छतेस महापथे ।।


येथून स्त्री गेली किंवा पुरुष गेला हे कांही मला ठाऊक नाहीं. तथापि या मोठ्या रस्त्यानें एक हाडांचा सांगाडा जात आहे खरा!

या कर्मस्थानानें कामविकार नष्टप्राय होतो, व योग्याला प्रथम ध्यानापर्यंत मजल मारता येते. तदनंतर दुसर्‍या कर्मस्थानाच्या योगे इतरस ध्यानेंहि संपादितां येतात.