श्रावकसंघ 9
देवदत्ताने केलेला संघभेद
संघांत सरळपणा आणि मैत्रीभाव राहावा यासंबंधीं भगवान् फार खबरदारी घेत असे. तथापि मनुष्यस्वभाव असा कांही विचित्र आहे की, त्याच्या समुदायांत मतभेद होऊन तट पडावयाचेच. याला मुख्य कारण म्हटलें म्हणजे अभिमान आणि त्याच्या मागोमाग अज्ञान. मनुष्य कितीही साधेपणाने वागला, तरी तो जर पुढारी होण्याची इच्छा बाळगीत असला, तर दुसर्याच्या गुणांना अवगुणांचें स्वरूप देऊन आपला मोठेपणा वाढविण्याचा प्रयत्न केल्यावाचून राहणार नाही. त्याच्या जाळ्यांत जर अज्ञानी लोक सापडले, तर त्याला सहज एखादा विलक्षण संप्रदाय स्थापतां येतो.
बौद्ध संघांत अशा प्रकारचा पहिला भिक्षु म्हटला म्हणजे देवदत्त होय. हा शाक्यांपैकी एक असून बुद्धाचा नातेवाईक होता. याने संघाचें पुढारीपणा आपल्या स्वाधीन करावें अशी भगवंताला विनवणी केली. भगवंताने ती मान्य केली नाही. तेव्हा अजातशत्रु राजाकडून बुद्धाला मारण्यासाठी त्याने मारेकरी पाठविले. पण ते बुद्धाचा खून न करतां उलट त्याचेच शिष्य झाले. तेव्हा देवदत्ताने गृध्रकूट पर्वताच्या एका टेकडीवरून बुद्धावर एक मोठी धोंड टाकली. तिची एक चीप बुद्धाच्या पायावर लागून त्याला जखम झाली. ती बरी झाल्यावर भगवान राजगृहांत भिक्षाटनास गेला असतां देवदत्ताने त्याच्यावर नालगिरि नांवाचा मदोन्मत्त हत्ती सोडावयास लावलें. त्याने भगवंताची पदधूलि मस्तकावर घेतली आणि तो पुन्हा आपल्या पागेंत जाऊन उभा राहिला. याप्रमाणे सर्व मसलती फसल्यावर देवदत्ताने संघाला तपश्चर्येचे कडक नियम घालून देण्याची भगवंताला विनंती केली आणि ती भगवंताला मान्य न झाल्यामुळे संघांत तट पाडून व कांही भिक्षूंना बरोबर घेऊन तो गयेला गेला.
देवदत्ताची ही कथा सविस्तरपणें चुल्लवग्गांत आली आहे.* परंतु तिच्यांत ऐतिहासिक तथ्य फार थोडें दिसतें. कां की, देवदत्त जर खून करण्याइतका दुष्ट होता, तर त्याला संघांत तट पाडतां येणें शक्य झालें नसतें आणि कांही भिक्षु त्याचे भक्त बनले नसते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* 'बुद्धलीलासारसंग्रह', पृ. १७९-१८८ पहा.

अजातशत्रु युवराज असतांनाच त्याची आणि देवदत्ताची मैत्री जमली आणि तेव्हापासून देवदत्त पुढारीपणासाठी प्रयत्न करूं लागला, असें लाभसत्कारसंयुक्ताच्या ३६ व्या सुत्तावरून दिसून येतें. त्या सुत्ताचा सारांश असा ः-
'बुद्ध भगवान राजगृह येथे वेळुवनांत राहत होता. त्या काळीं अजातशत्रु राजकुमार ५०० रथ बरोबर घेऊन सकाळीं संध्याकाळीं देवदत्ताच्या दर्शनास जात असे आणि देवदत्ताला ५०० पात्रांचें जेवण पाठवीत असे. कांही भिक्षूंनी ही गोष्ट भगवंताला सांगितली. तेव्हा भगवान म्हणाला, ''भिक्षुहो, देवदत्ताच्या लाभसत्काराची स्पृहा करूं नका. लाभामुळे देवदत्ताची हानीच होणार आहे, वृद्धि होणार नाही.'' '
याशिवाय देवदत्ताला उद्देशून भगवंताने म्हटलेली खालील गाथा दोन ठिकाणीं आढळते.
फलं वे कदलिं हन्ति फलं वेळुं फलं नळं ।
सक्कारो कापुरिसं हन्ति गब्भो अस्सतरिं यथा ॥*
'फळ केळीचा नाश करतें, फळ वेळूचा आणि फळ नळाचा नाश करतें; आणि खेचरीचा र्भ खेचरीचा नाश करतो. त्याचप्रमाणे सत्कार कापुरुषाचा नाश करतो.'

* 'संयुक्तनिकाय' (P.T.S.) भाग २, पृ. २४१, आणि 'अंगुत्तरनिकाय' (P.T.S.) भाग २, पृ. ७३.

यावरून देवदत्त अधिकार मिळविण्यासाठी अजातशत्रुच्या साहाय्याने कशी खटपट करीत होता याचें अनुमान करतां येतें. अजातशत्रु बापाला मारून गादीवर आला तरी देखील देवदत्ताने त्याची संगति सोडली नाही आणि त्याच्याच मदतीने संघांत फुट पाडून बर्याच भिक्षूंना त्याने आपल्या नादीं लावलें. हं त्याचें कृत्य बुद्ध भगवंताला आवडलें नाही यांत आश्चर्य कसलें ? परंतु देवदत्ताने पाडलेली फूट संघाला हानिकारक न होतां त्या संकटांतून संघ सुखरूपपणें पार पडला.*

* 'बुद्धलीलासारसंग्रह', पृ. १८७-१८८ पाहा.