Get it on Google Play
Download on the App Store

तपश्चर्या व तत्वबोध 4

भगवान- त्याचप्रमाणें, हे अग्गिवेस्सना, जे श्रमण आणि ब्राह्मण कामोपभोग सोडून शरीराने आणि मनाने त्यांपासून अलिप्‍त राहतात खरे, पण ज्यांच्या मनांतील कामविकार शमलेले नसतात, त्यांनी जरी कितीही कष्ट सोसले, तरी त्यापासून त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबोध प्राप्‍त व्हावयाचा नाही.  हे अग्गिवेस्सना, आणखी तिसरी एक उपमा मला सुचली.  एखादें कोरडें लाकूड, पाण्यापासून दूर पडलें आहे, आणि एखादा मनुष्य त्याच्यावर उत्तरारणि दूर पडलें आहे, आणि एखादा मनुष्य त्याच्यावर उत्तरारणि घासून अग्नि उत्पन्न करण्याचा प्रयत्‍न करूं लागला, तर तो आग उत्पन्न करूं शकेल की नाही ?

सच्चक- होय, भो गोतम, कारण तें लाकूड साफ कोरडें आहे, आणि पाण्यामध्ये पडलेलें नाही.

भगवान् - त्याचप्रमाणे, हे अग्गिवेस्सना, जे श्रमणब्राह्मण कायेने आणि चित्ताने कामोपभोगांपासून दूर राहतात, आणि ज्यांच्या मनांतील कामविकार साफ नष्ट झाले आहेत, त्यांनी शरीराला अत्यंत कष्ट दिले काय किंवा न दिले काय, त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबोध प्राप्‍त होणें शक्य आहे.

ह्या तीन उपमा बोधिसत्त्वाला तपश्चर्येला आरंभ करतांना सुचल्या.  जे श्रमणब्राह्मण यज्ञयागादिकांतच समाधान मानतात, त्यांनी तशा प्रसंगीं तपश्चर्या करून शरीराला कष्ट दिले, तरी त्यांना तत्त्वबोध व्हावयाचा नाही.  दुसरे श्रमणब्राह्मण यज्ञयागाचा मार्ग सोडून देऊन जंगलांत जाऊन राहिले, पण जर त्यांच्या अंतःकरणांतील कामविकार नष्ट झाले नाहीत, तर त्यांच्या तपश्चर्येपासून कांही निष्पन्न होणार नाही.  ओल्या लाकडावर उत्तरारणि घासून अग्नि उत्पन्न करण्याप्रमाणे त्यांचा प्रयत्‍न व्यर्थ जाणार.  पण जर एखादा माणूस कामोपभोगांपासून दूर राहून मनांतील कामविकार साफ नष्ट करूं शकला, तर त्याला देहदंडावाचून तत्त्वबोध प्राप्‍त करून घेतां येईल.

हठयोग

बोधिसत्त्वाला ह्या उपमा सुचल्या, तरी त्याने त्या काळच्या श्रमणव्यवहाराला अनुसरून तीव्र तपश्चर्या करण्याचा निश्चय केला.  प्रथमतः त्याने हठयोगावर भर दिला.  भगवान सच्चकाला म्हणतो, ''हे अग्गिवेस्सन, मी जेव्हा दातांवर दात दाबून आणि जीभ टाळूला लावून माझ्या चित्ताचें दमन करीं, तेव्हा माझ्या काखेंतून घाम सुटे.  ज्याप्रमाणें एखादा बलवान पुरुष दुर्बल माणसाला डोक्याला किंवा खांद्याला धरून दाबतो, त्याप्रमाणें मी माझें चित्त दाबीत होतों.

''हे अग्गिवेस्सन, त्यानंतर आश्वासप्रश्वास दाबून मी ध्यान करूं लागलों.  त्या वेळीं माझ्या कानांतून श्वास निघण्याचा शब्द होऊं लागला.  जसा लोहाराचा भाता चालतो, तसा माझ्या कानांतून आवाज येऊं लागला.  तरी पण हे अग्गिवेस्सन, मी आश्वासप्रश्वास आणि कान दाबून ध्यान करूं लागलों.  तेव्हा तीक्ष्ण तरवारीच्या टोकाने माझें डोकें कोणी मंथन करीत आहे, असा मला भास झाला.  तथापि हेंच ध्यान मी पुढे चालविलें आणि माझ्या डोक्याला चामड्याच्या पट्टयाचें वेष्टन देऊन कोणी घट्ट आवळीत आहे असें वाटूं लागलें.  तरी तेंच ध्यान मी पुढे चालू ठेवलें.  त्यामुळे माझ्या उदरांत वेदना उठल्या.  कसाई शस्त्रने जसें गाईचें पोट कोरतो, तसें माझें पोट कोरलें जात आहे असें मला वाटलें.  या सर्व प्रसंगीं माझा उत्साह कायम होता, स्मृति स्थिर होती, पण शरीरामध्ये त्राण कमी झालें.  तथापि त्या कष्टप्रद वेदना माझ्या चित्ताला बाधूं शकल्या नाहीत.''

तिसर्‍या प्रकरणांत श्रमणांच्या नानाविध तपश्चर्या दिल्या आहेत.  त्याच्यांत हठयोगाचा समावेश झालेला नाही.  तथापि त्या काळीं वरच्या सारख्या हठयोगाचा अभ्यास करणारे तपस्वी होते, असें गृहीत धरावें लागतें.  नाही तर बोधिसत्त्वाने तशा योगाचा अभ्यास आरंभिला नसता.

भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 1 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 2 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 3 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 4 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 5 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 6 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 7 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 8 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 9 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 10 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 11 आर्यांचा जय 1 आर्यांचा जय 2 आर्यांचा जय 3 आर्यांचा जय 4 आर्यांचा जय 5 समकालीन राजकीय परिस्थिति 1 समकालीन राजकीय परिस्थिति 2 समकालीन राजकीय परिस्थिति 3 समकालीन राजकीय परिस्थिति 4 समकालीन राजकीय परिस्थिति 5 समकालीन राजकीय परिस्थिति 6 समकालीन राजकीय परिस्थिति 7 समकालीन राजकीय परिस्थिति 8 समकालीन राजकीय परिस्थिति 9 समकालीन राजकीय परिस्थिति 10 समकालीन राजकीय परिस्थिति 11 समकालीन राजकीय परिस्थिति 12 समकालीन राजकीय परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 1 समकालीन धर्मिक परिस्थिति 2 समकालीन धर्मिक परिस्थिति 3 समकालीन धर्मिक परिस्थिति 4 समकालीन धर्मिक परिस्थिति 5 समकालीन धर्मिक परिस्थिति 6 समकालीन धर्मिक परिस्थिति 7 समकालीन धर्मिक परिस्थिति 8 समकालीन धर्मिक परिस्थिति 9 समकालीन धर्मिक परिस्थिति 10 समकालीन धर्मिक परिस्थिति 11 समकालीन धर्मिक परिस्थिति 12 समकालीन धर्मिक परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 14 गोतम बोधिसत्त्व 1 गोतम बोधिसत्त्व 2 गोतम बोधिसत्त्व 3 गोतम बोधिसत्त्व 4 गोतम बोधिसत्त्व 5 गोतम बोधिसत्त्व 6 गोतम बोधिसत्त्व 7 गोतम बोधिसत्त्व 8 गोतम बोधिसत्त्व 9 गोतम बोधिसत्त्व 10 गोतम बोधिसत्त्व 11 गोतम बोधिसत्त्व 12 गोतम बोधिसत्त्व 13 गोतम बोधिसत्त्व 14 तपश्चर्या व तत्वबोध 1 तपश्चर्या व तत्वबोध 2 तपश्चर्या व तत्वबोध 3 तपश्चर्या व तत्वबोध 4 तपश्चर्या व तत्वबोध 5 तपश्चर्या व तत्वबोध 6 तपश्चर्या व तत्वबोध 7 तपश्चर्या व तत्वबोध 8 तपश्चर्या व तत्वबोध 9 तपश्चर्या व तत्वबोध 10 तपश्चर्या व तत्वबोध 11 तपश्चर्या व तत्वबोध 12 तपश्चर्या व तत्वबोध 13 तपश्चर्या व तत्वबोध 14 तपश्चर्या व तत्वबोध 15 श्रावकसंघ 1 श्रावकसंघ 2 श्रावकसंघ 3 श्रावकसंघ 4 श्रावकसंघ 5 श्रावकसंघ 6 श्रावकसंघ 7 श्रावकसंघ 8 श्रावकसंघ 9 श्रावकसंघ 10 श्रावकसंघ 11 श्रावकसंघ 12 श्रावकसंघ 13 श्रावकसंघ 14 श्रावकसंघ 15 श्रावकसंघ 16