Get it on Google Play
Download on the App Store

गोतम बोधिसत्त्व 2

बोधिसत्त्वाचें कुल

बोधिसत्त्वाच्या कुळाची आणि बाळपणाची माहिती त्रिपिटकांत फार थोडी सापडते.  ती प्रसंगवशात् उपदेशिलेल्या सुत्तांत आली असून तिचा आणि अट्ठकथांत सापडणार्‍या माहितीचा कधी कधी मुळीच मेळ बसत नाही.  यास्तव, या परस्परविरोधी माहितीची नीट छाननी करून त्यांतून काय निष्पन्न होतें तें पाहणें योग्य आहे.

मज्झिमनिकायाच्या चूळदुक्खक्खन्ध सुत्ताच्या अट्ठकथेंत गोतमाच्या कुटुंबाची माहिती सापडते ती अशी :-

''शुद्धोदन, शुक्लोदन, शाक्योदन, धोतोदन आणि अमितोदन हे पांच भाऊ.  अमितादेवी त्यांची बहीण.  तिष्यस्थविर तिचा मुलगा.  तथागत आणि नंद शुद्धोदनाचे मुलगे.  महानाम आणि अनुरुद्ध शुक्लोदनाचे, आणि आनन्दस्थविर अमितोदनाचा मुलगा.  तो भगवंतापेक्षा लहान, आणि महानाम मोठा.''

येथे दिलेल्या अनुक्रमाप्रमाणें अमितोदन शेवटला भाऊ दिसतो व त्याचा मुलगा आनंद भगवंतापेक्षा वयाने लहान होता, हें ठीकच आहे.  परंतु मनोरथपूरणी अट्ठकथेंत अनुरुद्धासंबंधाने लिहितांना 'अमितोदनसक्कस गेहे पटिसंधिं गण्हि' (अमितोदन शाक्याच्या घरीं जन्मला) असें म्हटलें आहे !  एकाच बुद्धघोषाचार्याने लिहिलेल्या या दोन अट्ठकथांत असा विरोध दिसतो.  पहिल्या अट्ठकथेंत आनंद अमितोदनाचा मुलगा होता असें म्हणतो; आणि दुसर्‍या अट्ठकथेंत अनुरुद्ध त्याचा मुलगा म्हणतो.  तेव्हा शुक्लोदन इत्यादि नांवें देखील काल्पनिक आहेत की काय असा संशय येतो.

बोधिसत्त्वाचें जन्मस्थान

सुत्तनिपाताच्या वर दिलेल्या अवतरणांत बुद्धाचा जन्म लुम्बिनी जनपदांत झाला असें आहे.  आजला देखील या ठिकाणाला लुम्बिनीदेवी असें म्हणतात आणि त्या ठिकाणीं जो जमिनींत गाडून गेलेला अशोकाचा शिलास्तंभ सापडला, त्याच्यावरील लेखांत ''लुंमिनिगामे उबालिके कते'' हें वाक्य आहे.  अर्थात् बोधिसत्त्वाचा जन्म लुम्बिनी गावांत झाला, असें पूर्णपणें सिद्ध होतें.

दुसर्‍या अनेक सुत्तांतून महानाम शाक्य कपिलवस्तूचा राहणारा होता अशा अर्थाचा उल्लेख सापडतो.  पण शुद्धोदन कपिलवस्तूंत होता असा महावग्गांत तेवढा उल्लेख आहे.  लुम्बिनीग्राम आणि कपिलवस्तु यांच्यामध्ये १४।१५ मैलांचें अंतर होतें.  तेव्हा शुद्धोदन कधी कधी लुम्बिनी गावाच्या आपल्या जमीनदारींत राहत होता व तेथेच बोधिसत्त्व जन्मला असें म्हणावें लागेल.  पण खाली दिलेल्या अंगुत्तरनिकायाच्या तिकनिपातांतील १२४ व्या सुत्तावरून या विधानालाही बळकट बाधा येते.

कालामाचा आश्रम

एके समयीं भगवान् कोसल देशांत प्रवास करीत करीत कपिलवस्तूला आला.  तो आल्याचें वर्तमान ऐकून महानाम शाक्याने त्याची भेट घेतली.  तेव्हा महानामाला त्याने आपणाला एक रात्र राहण्यासाठी जागा पाहण्यास सांगितलें.  परंतु भगवंताला राहण्यासाठी योग्य जागा महानामाला कोठेच सापडली नाही.  परत येऊन तो भगवंताला म्हणाला, ''भदन्त, आपणासाठी योग्य जागा मला सापडत नाही.  आपला पूर्वीचा सब्रह्मचारी भरण्डु कालाम याच्या आश्रमांत आपण एक रात्र राहा.''  भगवंताने महानामाला तेथे आसन तयार करावयास सांगितलें व तो त्या रात्रीं त्या आश्रमांत राहिला.

दुसर्‍या दिवशीं सकाळीं महानाम भगवंताच्या भेटीला गेला.  तेव्हा भगवान् त्याला म्हणाला, ''या लोकीं, हे महानाम, तीन प्रकारचे धर्मगुरु आहेत.  पहिला कामोपभोगांचा समतिक्रम (त्याग) दाखवितो, पण रूपांचा आणि वेदनांचा समतिक्रम दाखवीत नाही.  दुसरा कापोपभोगांचा व रूपांचा समतिक्रम दाखवितो, पण वेदनांचा समतिक्रम दाखवीत नाही.  तिसरा ह्या तिहींचाही समतिक्रम दाखवितो.  ह्या धर्मगुरूंचें ध्येय एक आहे की भिन्न आहे ?''

त्यावर भरण्डु कालाम म्हणाला, ''हे महानाम, या सर्वांचें ध्येय एकच आहे असें म्हण.''  पण भगवान् म्हणाला, ''महानामा, त्यांचें ध्येय भिन्न आहे असें म्हण.''  दुसर्‍यांदा व तिसर्‍यांदाही भरण्डूने त्यांचें एकच ध्येय असें म्हणण्यास सांगितलें; व भगवंताने त्यांचीं ध्येयें भिन्न आहेत असें म्हणण्यास सांगितलें.  महानामासारख्या प्रभावशाली शाक्यासमोर श्रमण गोतमाने आपला उपमर्द केला असें वाटून भरण्डु कालाम जो कपिलवस्तूहून चालता झाला, तो कधीही परत आला नाही.

भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 1 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 2 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 3 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 4 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 5 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 6 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 7 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 8 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 9 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 10 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 11 आर्यांचा जय 1 आर्यांचा जय 2 आर्यांचा जय 3 आर्यांचा जय 4 आर्यांचा जय 5 समकालीन राजकीय परिस्थिति 1 समकालीन राजकीय परिस्थिति 2 समकालीन राजकीय परिस्थिति 3 समकालीन राजकीय परिस्थिति 4 समकालीन राजकीय परिस्थिति 5 समकालीन राजकीय परिस्थिति 6 समकालीन राजकीय परिस्थिति 7 समकालीन राजकीय परिस्थिति 8 समकालीन राजकीय परिस्थिति 9 समकालीन राजकीय परिस्थिति 10 समकालीन राजकीय परिस्थिति 11 समकालीन राजकीय परिस्थिति 12 समकालीन राजकीय परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 1 समकालीन धर्मिक परिस्थिति 2 समकालीन धर्मिक परिस्थिति 3 समकालीन धर्मिक परिस्थिति 4 समकालीन धर्मिक परिस्थिति 5 समकालीन धर्मिक परिस्थिति 6 समकालीन धर्मिक परिस्थिति 7 समकालीन धर्मिक परिस्थिति 8 समकालीन धर्मिक परिस्थिति 9 समकालीन धर्मिक परिस्थिति 10 समकालीन धर्मिक परिस्थिति 11 समकालीन धर्मिक परिस्थिति 12 समकालीन धर्मिक परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 14 गोतम बोधिसत्त्व 1 गोतम बोधिसत्त्व 2 गोतम बोधिसत्त्व 3 गोतम बोधिसत्त्व 4 गोतम बोधिसत्त्व 5 गोतम बोधिसत्त्व 6 गोतम बोधिसत्त्व 7 गोतम बोधिसत्त्व 8 गोतम बोधिसत्त्व 9 गोतम बोधिसत्त्व 10 गोतम बोधिसत्त्व 11 गोतम बोधिसत्त्व 12 गोतम बोधिसत्त्व 13 गोतम बोधिसत्त्व 14 तपश्चर्या व तत्वबोध 1 तपश्चर्या व तत्वबोध 2 तपश्चर्या व तत्वबोध 3 तपश्चर्या व तत्वबोध 4 तपश्चर्या व तत्वबोध 5 तपश्चर्या व तत्वबोध 6 तपश्चर्या व तत्वबोध 7 तपश्चर्या व तत्वबोध 8 तपश्चर्या व तत्वबोध 9 तपश्चर्या व तत्वबोध 10 तपश्चर्या व तत्वबोध 11 तपश्चर्या व तत्वबोध 12 तपश्चर्या व तत्वबोध 13 तपश्चर्या व तत्वबोध 14 तपश्चर्या व तत्वबोध 15 श्रावकसंघ 1 श्रावकसंघ 2 श्रावकसंघ 3 श्रावकसंघ 4 श्रावकसंघ 5 श्रावकसंघ 6 श्रावकसंघ 7 श्रावकसंघ 8 श्रावकसंघ 9 श्रावकसंघ 10 श्रावकसंघ 11 श्रावकसंघ 12 श्रावकसंघ 13 श्रावकसंघ 14 श्रावकसंघ 15 श्रावकसंघ 16