Get it on Google Play
Download on the App Store

समकालीन धर्मिक परिस्थिति 13

स्त्री साध्वींचे संघ

तपस्वी ॠषिमुनींत किंवा वैदिक ॠषींत स्त्रियांचा समावेश झाला नव्हता.  गार्गी वाचक्नवी सारख्या स्त्रिया ब्रह्मज्ञानाच्या चर्चेत भाग घेत होत्या.*  परंतु त्यांचे स्वतंत्र संघ नव्हते.  स्त्रियांचे स्वतंत्र संघ बुद्धकालापूर्वी एकदोन शतकें स्थापन झाले.  त्यांपैकी सर्वांत जुना जैन साध्वींचा संघ होता, असें वाटतें.  या जैन साध्वी वादविवादांत पटाईत होत्या, हें भद्रा कुंडलकेशा**  इत्यादिकांच्या गोष्टीवरून समजून येईल.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  बृ. उ. ३।६।१ इत्यादि.
**  बौद्धसंघाचा परिचय, पृ. २१४-२१७ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्वीचे ॠषिमुनि जंगलांत राहत आणि गावांत क्वचितच संचार करीत.  यास्तव त्यांना स्त्रियांचे संघ स्थापन करणें शक्य नव्हतें.  परंतु श्रमण लोक वस्तीच्या आसपास राहत आणि त्या काळची परिस्थिती अनुकूल असल्यामुळे त्यांना स्त्रियांचे संघ स्थापतां आले.  बौद्ध आणि जैन वाङ्‌मय वाचलें असतां एक विशेष गोष्ट दिसून येते ती ही की, त्या काळीं स्त्रिया धार्मिक बाबतींत पुरुषांप्रमाणेच पुढारलेल्या होत्या.  याचें कारण गणसत्ताक राज्यांत स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असे.  बुद्ध भगवंताने वज्जींना जे उन्नतीचे सात नियम घालून दिले, त्यांपैकी पांचवा, 'स्त्रियांचा मान राखला पाहिजे; विवाहित किंवा अविवाहित स्त्रीवर कोणत्याही प्रकारें बलात्कार होऊं देतां नये' हा आहे.  आणि त्याला अनुसरून बुद्धाच्या मरणापर्यंत तरी वज्जी लोक वागत असत.  वज्जींप्रमाणेच मल्लांच्या राज्यांत देखील बायकांचा मान ठेवण्यांत येत होता असें मानण्यास हरकत नाही.  अंग, काशी, शाकय, कोलिय इत्यादि गणसत्ताक राज्यांचें स्वातंत्र्य नष्ट झालें होतें, तरी अन्तर्गत व्यवस्था त्यांच्या हातांत असल्यामुळे त्यांच्या राज्यांत स्त्रीस्वातंत्र्याला फारसा धक्का पोचला नाही.

मगध आणि कोसल या देशांत एकसत्ताक राज्यपद्धति दृढमूल झाली असली, तरी त्या देशाच्या राजांना मूळच्या गणसत्ताक राज्यपद्धतीचें समूळ उन्मूलन करतां आलें नाही.  बिंबिसार महाराजने किंवा पसेनदि महाराजाने कोणत्याही स्त्रीला जबरदस्तीने आपल्या झनानखान्यांत आणल्याचा दाखला कोठेच सापडत नाही.

कांही एकसत्ताक राज्यांत स्त्रियांचा मान


गणसत्ताक राज्यपद्धति लोकांच्या स्मृतिपथांतून जात चालली आणि एकसत्ताक राज्यपद्धति जसजशी प्रबल होत गेली, तसतसें स्त्रियांचें स्वातंत्र्य देखील संपुष्टांत येत चाललें.  तथापि कांही राजे स्त्रियांचा योग्य मान ठेवीत असें उन्मादयन्तीच्या (उम्मदंतीच्या) गोष्टीवरून दिसून येईल.*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  उम्मदंतीजातक नं. ५२७.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बोधिसत्त्व शिवि राजकुलांत जन्मला.  त्याला शिविकुमार असेंच म्हणत.  शिविराजाच्या सेनापतीचा पुत्र अभिपारक आणि शिविकुमार समवयस्क होते.  तक्षशिलेला जाऊन त्या दोघांनी शास्त्राध्ययन केलें.  बापाच्या मरणानंतर शिविकुमार राजा झाला.  आणि सेनापतीच्या मरणानंतर त्याने अभिपारकाला सेनापति केलें.  अभिपारकाने उन्मादयन्ती नांवाच्या अत्यंत सुस्वरूप श्रेष्ठिकन्येशीं लग्न केलें.  राजा नगरप्रदक्षिणेला निघाला असतां खिडकींत उभी असलेल्या उन्मादयंतीची व त्याची दृष्टादृष्ट झाली.  राजा तिच्यावर मोहित होऊन उन्मत्त झाला व राजवाड्यांत जाऊन बिछान्यावर पडून राहिला.  अभिपारकाला हें वर्तमान समजलें, तेव्हा राजाजवळ जाऊन आपल्या बायकोचा स्वीकार करून उन्मत्तपणा सोडून देण्याबद्दल राजाची याने प्रार्थना केली.  त्यामुळे राजा शुद्धीवर येऊन म्हणाला, ''हा शिवींचा धर्म नव्हे.  मी शिवींचा पुढारी आहें.  आणि शिवींचा धर्म अनुपालन करणें माझें कर्तव्य आहे; म्हणून माझ्या चित्तविकाराला वश होणें मला योग्य नव्हे.''

ही कथा विस्तृत आणि रोचक आहे.  तिचें सार तेवढें येथें दिलें आहे.  ही रचणाराच्या वेळीं गणसत्ताक राज्यपद्धति पार नष्ट झाली होती असें दिसतें.  तथापि शिवींसारख्या गणसत्ताक राजांचें स्त्रियांविषयींचे कर्तव्य त्याला पूर्णपणें माहीत होतें; आणि ते सर्वसत्ताधारी राजांनी लक्षांत ठेवावें असा त्याचा हेतु होता.  शिवीकुमाराच्या भाषणाच्या शेवटीं त्याने ही गाथा घेतली आहे -

नेता पिता उग्गतो रट्ठपालो
धम्मं शिवीनं अपचायमानो ।
सो धम्ममेवानुविचिन्तयन्तो
तसमा सके चित्तवसे न वत्ते ॥


'मी शिवींचा नेता, पिता आणि राष्ट्रपालक पुढारी आहें.  म्हणून शिवींच्या कर्तव्याला मान देऊन आणि शिवींच्या धर्माचा नीट विचार करून माझ्या स्वतःच्या चित्तविकाराला मी वश होणार नाही.'

भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 1 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 2 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 3 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 4 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 5 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 6 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 7 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 8 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 9 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 10 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 11 आर्यांचा जय 1 आर्यांचा जय 2 आर्यांचा जय 3 आर्यांचा जय 4 आर्यांचा जय 5 समकालीन राजकीय परिस्थिति 1 समकालीन राजकीय परिस्थिति 2 समकालीन राजकीय परिस्थिति 3 समकालीन राजकीय परिस्थिति 4 समकालीन राजकीय परिस्थिति 5 समकालीन राजकीय परिस्थिति 6 समकालीन राजकीय परिस्थिति 7 समकालीन राजकीय परिस्थिति 8 समकालीन राजकीय परिस्थिति 9 समकालीन राजकीय परिस्थिति 10 समकालीन राजकीय परिस्थिति 11 समकालीन राजकीय परिस्थिति 12 समकालीन राजकीय परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 1 समकालीन धर्मिक परिस्थिति 2 समकालीन धर्मिक परिस्थिति 3 समकालीन धर्मिक परिस्थिति 4 समकालीन धर्मिक परिस्थिति 5 समकालीन धर्मिक परिस्थिति 6 समकालीन धर्मिक परिस्थिति 7 समकालीन धर्मिक परिस्थिति 8 समकालीन धर्मिक परिस्थिति 9 समकालीन धर्मिक परिस्थिति 10 समकालीन धर्मिक परिस्थिति 11 समकालीन धर्मिक परिस्थिति 12 समकालीन धर्मिक परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 14 गोतम बोधिसत्त्व 1 गोतम बोधिसत्त्व 2 गोतम बोधिसत्त्व 3 गोतम बोधिसत्त्व 4 गोतम बोधिसत्त्व 5 गोतम बोधिसत्त्व 6 गोतम बोधिसत्त्व 7 गोतम बोधिसत्त्व 8 गोतम बोधिसत्त्व 9 गोतम बोधिसत्त्व 10 गोतम बोधिसत्त्व 11 गोतम बोधिसत्त्व 12 गोतम बोधिसत्त्व 13 गोतम बोधिसत्त्व 14 तपश्चर्या व तत्वबोध 1 तपश्चर्या व तत्वबोध 2 तपश्चर्या व तत्वबोध 3 तपश्चर्या व तत्वबोध 4 तपश्चर्या व तत्वबोध 5 तपश्चर्या व तत्वबोध 6 तपश्चर्या व तत्वबोध 7 तपश्चर्या व तत्वबोध 8 तपश्चर्या व तत्वबोध 9 तपश्चर्या व तत्वबोध 10 तपश्चर्या व तत्वबोध 11 तपश्चर्या व तत्वबोध 12 तपश्चर्या व तत्वबोध 13 तपश्चर्या व तत्वबोध 14 तपश्चर्या व तत्वबोध 15 श्रावकसंघ 1 श्रावकसंघ 2 श्रावकसंघ 3 श्रावकसंघ 4 श्रावकसंघ 5 श्रावकसंघ 6 श्रावकसंघ 7 श्रावकसंघ 8 श्रावकसंघ 9 श्रावकसंघ 10 श्रावकसंघ 11 श्रावकसंघ 12 श्रावकसंघ 13 श्रावकसंघ 14 श्रावकसंघ 15 श्रावकसंघ 16