श्रावकसंघ 2
पंचवर्गीय भिक्षुसंघ
गोतम बोधिसत्त्व बुद्ध होऊन वाराणसीला ॠषिपत्तनांत आला तेव्हा त्या पंचवर्गीय भिक्षूंनी त्याचा आदरसत्कार देखील करूं नये असा बेत केला होता, इत्यादिक मजकूर पांचव्या प्रकरणांत आलाच आहे. अखेरीस या पंचवर्गीयांनी बोधिसत्त्वाचा धर्ममार्ग ऐकून घेतला आणि त्या प्रसंगीं एका तेवढ्या कौण्डिन्याने आपली संमति दर्शविली. तेव्हा बुद्ध भगवान उद्गारला, ''कौण्डिन्याने जाणलें (अञ्ञासि वत भो कोण्डञ्ञो).'' त्यामुळे कौण्डिन्याला 'अञ्ञासि कोण्डञ्ञ (आज्ञात कौण्डिन्य)' हेंच नांव पडलें. आणि ह्या एकाच गोष्टीवरून बौद्ध वाङ्मयांत कौण्डिन्याला प्रसिद्ध स्थान मिळालें. ह्यानंतर त्याने कोणतीही महत्त्वाची कामगिरी केल्याचा उल्लेख मुळीच सापडत नाही. प्रथमतः त्याने एकट्यानेच बुद्धाच्या नवीन धर्ममार्गाचें अभिनंदन केलें, हाच त्याचा पुरुषार्थ समजला पाहिजे.
तद्नंतर बुद्ध भगवंताने वप्प (वाष्प) आणि भद्दिय (भद्रिक) या दोघांची समजूत घातली. आणि कांही दिवसांनी त्यांना देखील या नवीन धर्ममार्गाचा बोध झाला. नंतर कांही काळाने महानाम व अस्सजि (अश्वजित्) यांना या नवीन धर्ममार्गाचा बोध झाला. आणि हे पंचवर्गीय भिक्षु बुद्धाचे एकनिष्ठ भक्त झाले. या कामीं किती वेळ गेला याचा कोठे उल्लेख नाही. पण पंचवर्गीय भिक्षु प्रथमतः बुद्धाचे शिष्य झाले, आणि या पाचांचा भिक्षुसंघ बनला, याबद्दल सुत्तपिटकाची आणि विनयपिटकाची एकवाक्यता आहे.
यश आणि त्याचे साथी
पंचवर्गीयांबरोबर बुद्ध भगवान् ॠषिपत्तनांत राहत असतां त्याला आणखी ५५ भिक्षु कसे मिळाले आणि त्या चातुर्मासानंतर भगवंताने राजगृहापर्यंत प्रवास करून भिक्षुसंघांत केवढी मोठी भर घातली याचें वर्णन महावग्गांत सापडतें. त्याचा सारांश येथे देत आहें.
वाराणसींत यश नांवाचा एक सुसंपन्न तरुण राहत होता. एकाएकीं प्रपंचांतून त्याचें मन उठलें आणि शांत स्थानाचा शोध करीत तो ॠषिपत्तनांत आला. बुद्धाने धर्मोपदेश करून त्याला आपल्या संघांत दाखल करून घेतलें. त्याच्या शोधासाठी त्याचे आईबाप आले. त्यांना बुद्धाने उपदेश केला आणि ते देखील बुद्धाचे उपासक झाले.
यश भिक्षु होऊन बुद्धाच्या संघांत दाखल झाला, हें वर्तमान वाराणसी नगरांत राहणार्या त्याच्या विमल, सुबाहु, पुण्णजि (पूर्णजित्) आणि गवंपति (गवांपति) ह्या चार मित्रांना समजलें, आणि ॠषिपत्तनांत येऊन ते देखील बुद्धाच्या भिक्षुसंघांत प्रविष्ट झाले. त्या सर्वांचे पन्नास तरुण मित्र होते. त्यांनी ॠषिपत्तनांत येऊन बुद्धोपदेश ऐकला आणि आपल्या मित्रांप्रमाणेंच संघांत प्रवेश केला. याप्रमाणे साठ भिक्षूंचा संघ ॠषिपत्तनांत गोळा झाला.
बहुजनहितासाठी धर्मप्रचार
चातुर्मासाच्या शेवटीं बुद्ध भगवान् या आपल्या भिक्षुसंघास म्हणाला, भिक्षुहो, ''प्रापंचिक आणि स्वर्गीय पाशांतून मी मुक्त झालों आहें, आणि तुम्हीं देखील या पाशांतून मुक्त झालां आहां. तेव्हा आता, भिक्षु हो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, देवांच्या आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी, धर्मोपदेश करण्यास प्रवृत्त व्हा. एका मार्गाने दोघे जाऊं नका. प्रारंभी कल्याणप्रद, मध्यंतरीं कल्याणप्रद आणि शेवटीं कल्याणप्रद अशा या धर्ममार्गाचा लोकांना उपदेश करा.''
याप्रमाणें बुद्ध भगवंताने आपल्या साठ भिक्षूंस चारी दिशांना पाठविलें. ते इतर तरुणांना भगवंतापाशीं आणीत आणि भगवान् त्यांना प्रव्रज्या देऊन आपल्या भिक्षुसंघांत दाखल करून घेत असे. पण त्या कामीं साठ भिक्षूंना व तरुण उमेदवारांना त्रास पडूं लागला; म्हणून परस्परच प्रव्रज्या देऊन आपल्या संघांत दाखल करून घेण्याला त्याने भिक्षूंना परवानगी दिली व तो स्वतः उरुवेलेकडे जाण्यास निघाला.