गोतम बोधिसत्त्व 1
गोतम बोधिसत्त्व
प्रकरण चवथें
गोतमाची जन्मतिथि
गोतमाच्या जन्मतिथीसंबंधाने अर्वाचीन पंडितांत बराच मतभेद आढळतो. दिवाण बहादूर स्वामिकन्नू पिल्ले यांच्या मतें बुद्धाचें परिनिर्वाण ख्रिस्तापूर्वी ४७८ व्या वर्षी झालें. इतर कांही पंडितांचें म्हणणें की, तें ख्रिस्तापूर्वी ४८६-८७ व्या वर्षी घडलें. पण आजकाल लागलेल्या नवीन शोधावरून महावंस आणि दीपवंस यांत दिलेली बुद्धपरिनिर्वाणाची तिथिच योग्य ठरते.* या ग्रंथांवरून बुद्धाचें परिनिर्वाण ख्रिस्तापूर्वी ५४३ व्या वर्षी झालें, असें सिद्ध होतें; आणि बुद्धपरिनिर्वाणाची ही तिथि गृहीत धरली, तर बुद्धाचा जन्म ख्रिस्तापूर्वी ६२३ व्या वर्षी झाला असें म्हणावें लागतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* The Early History of India by V. A. Smith (Oxford 1924) p. 49-50

बोधिसत्त्व
गोतमाच्या जन्मापासून बुद्धत्वापर्यंत त्याला बोधिसत्त्व म्हणण्याची वहिवाट फार प्राचीन आहे. पालि वाङ्मयांत सगळ्यांत प्राचीन जो सुत्तनिपात त्यांत म्हटलें आहे की,
सो बोधिसत्तो रतनवरो अतुल्यो ।
मनुस्सलोके हितसुखताय जातो ।
सक्यानं गामे जनपदे लुम्बिनेय्ये ।
श्रेष्ठ रत्नाप्रमाणे अतुलनीय असा तो बोधिसत्त्व लुम्बिनी जनपदांत शाक्यांच्या गावीं मानवांच्या हितसुखासाठी जन्मला.
बोधि म्हणजे मनुष्याच्या उद्धाराचें ज्ञान, आणि त्यासाठी प्रयत्न करणारा जो प्राणी (सत्त्व) तो बोधिसत्त्व होय. आरंभीं गोतमाच्या जन्मापासून त्याला संबोधिज्ञान होईपर्यंत हें विशेषण लावीत असावे. होतां होतां त्याने त्या जन्मापूर्वी दुसरे अनेक जन्म घेतले, अशी कल्पना प्रचलित झाली; आणि त्या पूर्व जन्मांत देखील त्याला बोधिसत्त्व हें विशेषण लावण्यांत येऊं लागलें. त्याच्या पूर्वजन्मींच्या कथांचा संग्रह जातकांत केला आहे; त्या गोष्टींमध्ये जें कोणी मुख्य पात्र असेल, त्याला बोधिसत्त्व ही संज्ञा लावून तो पूर्वजन्मींचा गोतमच होता असें म्हटलें आहे. ज्या कथेंत योग्य पात्र सापडलें नाही, तेथे बोधिसत्त्वाला कथेशीं विशेष संबंध नसलेल्या एखाद्या वनदेवतेचें किंवा दुसर्या एखाद्या व्यक्तीचें स्वरूप देऊन कसा तरी संबंध जुळवून आणला आहे. अस्तु. येथे गोतमाच्या जन्मापासून बुद्धत्वापर्यंत त्याला बोधिसत्त्व या नांवाने संबोधावयाचें आहे; त्याच्या पूर्वजन्माशीं या विशेषणाचा कांही संबंध नाही, असें समजावें.