Get it on Google Play
Download on the App Store

गोतम बोधिसत्त्व 11

बोधिसत्त्वाच्या गृहत्यागाला कारण कोणतें ?

त्यानंतरचा महत्त्वाचा प्रसंग म्हटला म्हणजे बोधिसत्त्व आपल्या प्रासादांतून उद्यानभूमीकडे जातो, हा होय.  शुद्धोदन महाराजाने त्याच्या वाटेंत कोणी म्हातारा, व्याधित किंवा मृत मनुष्य येऊं नये असा बंदोबस्त केला असतांही देवता एक निर्भित म्हातारा त्याच्या निदर्शनाला आणतात; आणि बोधिसत्त्व विरक्त होऊन परत आपल्या प्रासादांत जातो.  दुसर्‍या खेपेला व्याधित, तिसर्‍या खेपेला मृत आणि चौथ्या खेपेला देवता त्याला एक परिव्राजक दाखवितात; त्यामुळे तो पूर्ण विरक्त होऊन व गृहत्याग करून तत्त्वबोधाचा मार्ग शोधून काढण्याला प्रवृत्त होतो.  ह्या प्रसंगाची रसभरित वर्णनें ललितविस्तरादिक ग्रंथांत सापडतात.  तीं सर्वथैव ग्राह्य नाहीत असें म्हणावें लागतें.  जर बोधिसत्त्व बापाबरोबर किंवा एकटाच शेतावर जाऊन काम करीत होता, आणि आडार कालामाच्या आश्रमांत जाऊन त्याचें तत्त्वज्ञान शिकत होता, तर त्याने म्हातारा, व्याधित आणि मृत मनुष्य पाहिला नाही हें संभवेल कसें ?

शेवटच्या दिवशीं बोधिसत्त्व उद्यानांत गेला असतां ''देवतांनी एक उत्तम परिव्राजक निर्माण करून त्याच्या निदर्शनाला आणला.  तेव्हा बोधिसत्त्वाने सारथ्याला प्रश्न केला, 'हा कोण आहे बरें ?'  जरी त्या वेळीं-बोधिसत्त्व बुद्ध झाला नसल्या कारणाने-परिव्राजक किंवा परिव्राजकाचे गुण सारथ्याला माहीत नव्हते तरी देवतांच्या प्रभावाने तो म्हणाला, 'हा परिव्राजक आहे'; आणि त्याने प्रव्रज्येचे गुण वर्णिले,'' असें जातकअट्ठकथाकारांचें म्हणणें.  पण जर कपिलवस्तूमध्ये आणि शाक्यांच्या शेजारच्या राज्यांत परिव्राजकांचे आश्रम होते, तर बोधिसत्त्वाला किंवा त्याच्या सारथ्याला परिव्राजकांची मुळीच माहिती नसावी, हें आश्चर्य नव्हे काय ?

अंगुत्तरनिकायाच्या चतुक्कनिपातांत (सुत्त नं. १९५) वप्प शाक्याची गोष्ट आली आहे.  तो निर्ग्रंथ (जैन) श्रावक होता.  एकदा त्याचा व महामोग्गल्लानाचा संवाद चालला असतां बुद्ध भगवान तेथे आला, आणि त्याने वप्पाला उपदेश केला.  तेव्हा वप्पा म्हणाला, ''निर्ग्रंथाच्या (जैन साधूंच्या) उपासनेपासून मला कांही फायदा झाला नाही.  आता मी भगवंताचा उपासक होतों.''  अट्ठकथाकार वप्प भगवंताचा चुलता होता असें म्हणतो.  हें म्हणणें महादुक्खक्खन्धसुत्ताच्या अट्ठकथेशीं जुळत नाही.  कांहीही असो, वप्प नांवाचा एक वयोवृद्ध शाक्य जैन होता यांत शंका नाही.  म्हणजे बोधिसत्त्वाच्या जन्मापूर्वीच शाक्य देशांत जैन धर्माचा प्रसार झाला होता.  तेव्हा बोधिसत्त्वाला परिव्राजकांची माहिती नव्हती हें मुळीच संभवत नाही.

मग ह्या सर्व अद्‍भुत गोष्टी बोधिसत्त्वाच्या चरित्रांत आल्या कोठून ?  महापदानसुत्तांतून.*  वृद्ध मनुष्याला पाहिल्यावर बोधिसत्त्वाने सारथ्याला प्रश्न कसा केला, यासंबंधीं जातकअट्ठकथाकार म्हणतो, ''महापदाने आगतनयेन पुच्छित्वा'' (महापदानसुत्तांत आलेल्या कथेला अनुसरून प्रश्न विचारून).  म्हणजे या सर्व अद्‍भुत कथा महापदानसुत्तावरून घेतल्या आहेत असें म्हणावें लागतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  अपदान (सं. अवदान) म्हणजे सच्चरित्र.  थोरांच्या सच्चरित्राचा ज्या सुत्तांत संगृह आहे तें महापदानसुत्त.  यांत पूर्वयुगीन सहा व ह्या युगांतील गोतमबुद्ध मिळून सात बुद्धांचीं चरित्रें आरंभी संक्षेपाने देऊन मग विपस्सीबुद्धाचें चरित्र विस्ताराने वर्णिलें आहे.  तो एक नमुना असून त्याप्रमाणें इतर बुद्धांचीं चरित्रें वर्णावीं, असें अट्ठकथाकार म्हणतात.  ह्या वर्णनांतील बहुतेक भाग हें सुत्त रचण्यापूर्वी किंवा नंतर गोतमबुद्धाच्या चरित्रांत दाखल करण्यांत आले, आणि ते खुद्द त्रिपिटांत भिन्न भिन्न स्थळीं सापडतात.  उद्यानदर्शनाचा भाग मात्र त्रिपिटकांत नाही.  तो जातकट्ठकथाकाराने उचलला.  त्यापूर्वी ललितविस्तरांत व बुद्धचरितकाव्यांत ह्या कथेचा समावेश करण्यांत आला.

गोतम बोधिसत्त्वासाठी तीन प्रासाद बांधण्यांत आले होते, ही गोष्ट मी ऐतिहासिक समजत होतों.  परंतु ती देखील काल्पनिक असावी.  कारण शुद्धोदनासारखा स्वतः अंगमेहनत करणारा लहानसा जमीनदार आपल्या मुलासाठी तीन प्रासाद बांधील हें संभवत नाही.

'दीघनिकाय' भाग दुसरा, भाषांतरकार परलोकासाठी चिंतामण वैजनाथ राजवाडे, (प्रकाशक, ग्रंथसंपादक व प्रकाशक मंडळी, नं. ३८० ठाकुरद्वार रोड, मुंबई नं. २) या ग्रंथाच्या आरंभींच महापदानसुत्ताचें मराठी भाषांतर आलें आहे.  तें जिज्ञासु वाचकांनी अवश्य वाचावें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 1 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 2 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 3 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 4 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 5 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 6 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 7 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 8 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 9 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 10 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 11 आर्यांचा जय 1 आर्यांचा जय 2 आर्यांचा जय 3 आर्यांचा जय 4 आर्यांचा जय 5 समकालीन राजकीय परिस्थिति 1 समकालीन राजकीय परिस्थिति 2 समकालीन राजकीय परिस्थिति 3 समकालीन राजकीय परिस्थिति 4 समकालीन राजकीय परिस्थिति 5 समकालीन राजकीय परिस्थिति 6 समकालीन राजकीय परिस्थिति 7 समकालीन राजकीय परिस्थिति 8 समकालीन राजकीय परिस्थिति 9 समकालीन राजकीय परिस्थिति 10 समकालीन राजकीय परिस्थिति 11 समकालीन राजकीय परिस्थिति 12 समकालीन राजकीय परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 1 समकालीन धर्मिक परिस्थिति 2 समकालीन धर्मिक परिस्थिति 3 समकालीन धर्मिक परिस्थिति 4 समकालीन धर्मिक परिस्थिति 5 समकालीन धर्मिक परिस्थिति 6 समकालीन धर्मिक परिस्थिति 7 समकालीन धर्मिक परिस्थिति 8 समकालीन धर्मिक परिस्थिति 9 समकालीन धर्मिक परिस्थिति 10 समकालीन धर्मिक परिस्थिति 11 समकालीन धर्मिक परिस्थिति 12 समकालीन धर्मिक परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 14 गोतम बोधिसत्त्व 1 गोतम बोधिसत्त्व 2 गोतम बोधिसत्त्व 3 गोतम बोधिसत्त्व 4 गोतम बोधिसत्त्व 5 गोतम बोधिसत्त्व 6 गोतम बोधिसत्त्व 7 गोतम बोधिसत्त्व 8 गोतम बोधिसत्त्व 9 गोतम बोधिसत्त्व 10 गोतम बोधिसत्त्व 11 गोतम बोधिसत्त्व 12 गोतम बोधिसत्त्व 13 गोतम बोधिसत्त्व 14 तपश्चर्या व तत्वबोध 1 तपश्चर्या व तत्वबोध 2 तपश्चर्या व तत्वबोध 3 तपश्चर्या व तत्वबोध 4 तपश्चर्या व तत्वबोध 5 तपश्चर्या व तत्वबोध 6 तपश्चर्या व तत्वबोध 7 तपश्चर्या व तत्वबोध 8 तपश्चर्या व तत्वबोध 9 तपश्चर्या व तत्वबोध 10 तपश्चर्या व तत्वबोध 11 तपश्चर्या व तत्वबोध 12 तपश्चर्या व तत्वबोध 13 तपश्चर्या व तत्वबोध 14 तपश्चर्या व तत्वबोध 15 श्रावकसंघ 1 श्रावकसंघ 2 श्रावकसंघ 3 श्रावकसंघ 4 श्रावकसंघ 5 श्रावकसंघ 6 श्रावकसंघ 7 श्रावकसंघ 8 श्रावकसंघ 9 श्रावकसंघ 10 श्रावकसंघ 11 श्रावकसंघ 12 श्रावकसंघ 13 श्रावकसंघ 14 श्रावकसंघ 15 श्रावकसंघ 16