Get it on Google Play
Download on the App Store

समकालीन राजकीय परिस्थिति 3

३. कासी
कासी किंवा काशी यांची राजधानी वाराणसी होती. तेथल्या बहुतेक राजांना ब्रह्मदत्त म्हणत असत, असें जातक अट्ठकथेवरून दिसून येतें. त्यांच्या राज्यपद्धतीसंबंधाने फारशी माहिती सापडत नाही. तथापि काशीचे राजे (महाजन) फारच उदारधी होते. त्यांच्या राज्यांत कलाकौशल्याचा उत्तम विकास झाला होता. बुद्धसमकालीं देखील उत्कृष्ट पदार्थांना 'कासिक' म्हणत असत. कासिक वस्त्र, कासिक चंदन इत्यादि शब्द त्रिपिटक वाङ्‌मयांत पुष्कळ ठिकाणी आढळतात. वाराणसींतील अश्वसेन राजाच्या वामा राणीच्या उदरीं पार्श्वनाथ-जैनांचा तेविसावा तीर्थंकर-जन्मला. त्याने आपल्या उपदेशाला सुरवात गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वी सरासरी २४३ व्या वर्षी केली असावी. म्हणजे काशीचे महाजन केवळ कलाकौशल्यांतच नव्हे, तर धार्मिक विचारांत देखील अग्रणी होते, असें म्हणावें लागतें. परंतु बुद्धसमकालीं या देशाचें स्वातंत्र्य पार नष्ट होऊन कोसल देशांत त्याचा समावेश झाला होता. 'अंगमगधा'च्या समासाप्रमाणेंच 'कासीकोसला' हा देखील शब्द प्रचारांत आला होता.

४. कोसला
कोसल देशाची राजधानी श्रावस्ती. ही अचिरवती (सध्या राप्ती) नदीच्या काठीं होती; आणि तेथे पसेनदि (प्रसेनजित्) राजा राज्य करीत असे. तो वैदिक धर्माचा पूर्ण अनुयायी असून मोठमोठाले यज्ञ करीत होता, असें कोसलसुत्तांतील एका सुत्तावरून दिसून येतें. तथापि त्याच्या राज्यांत श्रमणांचा मान ठेवला जात असे. अनाथपिंडिक* नांवाने प्रसिद्धीस आलेल्या एका मोठ्या श्रेष्ठीने बुद्धाच्या भिक्षुसंघासाठी श्रावस्ती येथे जेतवन नावाचा विहार बांधला. विशाखा नांवाच्या प्रसिद्ध उपासिकेने देखील पूर्वाराम नांवाचा एक मोठा प्रासाद भिक्षूंसाठी बांधून दिला. या दोन्ही ठिकाणीं बुद्ध भगवान भिक्षुसंघासह मधून मधून राहत असे. त्याचे पुष्कळ चातुर्मास येथेच गेले असावेत. कां की, बुद्धाने सर्वांत जास्त उपदेश अनाथपिंडिकाच्या आश्रमांत केल्याचा दाखला त्रिपिटक वाङ्‌मयांत सापडतो. पसेनदि राजा जरी यज्ञयागांचा भोक्ता होता, तरी मधूनमधून तो बुद्धाच्या दर्शनासाठी अनाथपिंडिकाच्या आश्रमांत जात असे. त्याला अनेकदा बुद्धाने केलेल्या उपदेशाचा संग्रह कोसलसुत्तांत सापडतो.**
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* याचें खरें नांव सुदत्त होतें. अनाथांना तो जेवण (पिण्ड) देत असे, म्हणून त्याला अनाथपिण्डिक म्हणत.
** या संयुक्ताच्या पहिल्याच सुत्तांत पसेनदि बुद्धाचा उपासक झाल्याची कथा आहे; पण नवव्या सुत्तांत पसेनदीच्या महायज्ञाचें वर्णन येते. तेव्हा पसेनदि राजा खरा बुद्धोपासक झाला होता, असें म्हणतां येत नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ललितविस्तरांतील या राजवंशाच्या वर्णनावरून असें दिसून येतें की, ते राजे मातंगांच्या हीन जातींतून उदयाला आले. धम्मपद-अट्ठकथेंत सापडणार्‍या विडूडभाच्या (विदुर्दभाच्या) गोष्टीवरून देखील ललितविस्तरांतील विधानाला बळकटी येते.

पसेनदि राजा बुद्धाला फार मानीत होता. त्याच्या शाक्यकुळांतून एखाद्या राजकन्येशीं लग्न करण्याच्या पसेनदीने बेत केला. पण शक्य राजे कोसलराजकुलाला नीच मानीत असल्यामुळे त्यांना आपली कन्या कोसलराजाला देणें योग्य वाटत नव्हते. तथापि शाक्यांवर कोसलराजाचीच सत्ता चालत असल्यामुळे त्याची मागणी नाकबूल करतां येईना. त्यांनी अशी युक्ति योजिली की, महानाम शाक्याची दासीकन्या वासभखत्तिया हिला महानामाने आपली स्वतःची कन्या म्हणून कोसल राजाला द्यावी. कोसल राजाच्या अमात्यांना ही कन्या पसंत पडली. महानाम तिच्याबरोबर बसून जेवल्यामुळे ती त्याची मुलगी, अशी त्यांची खात्री झाली; आणि ठरल्याप्रमाणें वासनखत्तियेचा शुभमुहूर्तावर कोसलराजाशी विवाह झाला. राजाने तिला पट्टराणी केलें. तिचा मुलगा विडूडभ सोळा वर्षांचा झाल्यावर आपल्या आजोळीं शाक्यांकडे गेला. शाक्यांनी आपल्या संस्थागारांत (नगरमंदिरांत) त्याचा योग्य सन्मान केला. पण तो निघून गेल्यावर त्याचें आसन धुण्यांत आलें; आणि आपण दासीपुत्र आहों, ही गोष्ट विडूडभाच्या कानीं गेली. वयांत आल्यावर विडूडभाने जबरदस्तीने कोसल देशाचें राज्य बळकावलें व वृद्ध पसेनदीला श्रावस्तींतून हाकून दिलें. पसेनदि आपला भाचा अजातशत्रु याच्या आश्रयाला जाण्यासाठी अज्ञात वेषाने राजगृहाला जात असतां अत्यंत कष्ट पावून राजगृहाबाहेरच्या एका धर्मशाळेंत निवर्तला.

भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 1 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 2 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 3 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 4 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 5 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 6 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 7 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 8 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 9 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 10 भगवान बुद्ध (पूर्वार्ध) 11 आर्यांचा जय 1 आर्यांचा जय 2 आर्यांचा जय 3 आर्यांचा जय 4 आर्यांचा जय 5 समकालीन राजकीय परिस्थिति 1 समकालीन राजकीय परिस्थिति 2 समकालीन राजकीय परिस्थिति 3 समकालीन राजकीय परिस्थिति 4 समकालीन राजकीय परिस्थिति 5 समकालीन राजकीय परिस्थिति 6 समकालीन राजकीय परिस्थिति 7 समकालीन राजकीय परिस्थिति 8 समकालीन राजकीय परिस्थिति 9 समकालीन राजकीय परिस्थिति 10 समकालीन राजकीय परिस्थिति 11 समकालीन राजकीय परिस्थिति 12 समकालीन राजकीय परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 1 समकालीन धर्मिक परिस्थिति 2 समकालीन धर्मिक परिस्थिति 3 समकालीन धर्मिक परिस्थिति 4 समकालीन धर्मिक परिस्थिति 5 समकालीन धर्मिक परिस्थिति 6 समकालीन धर्मिक परिस्थिति 7 समकालीन धर्मिक परिस्थिति 8 समकालीन धर्मिक परिस्थिति 9 समकालीन धर्मिक परिस्थिति 10 समकालीन धर्मिक परिस्थिति 11 समकालीन धर्मिक परिस्थिति 12 समकालीन धर्मिक परिस्थिति 13 समकालीन धर्मिक परिस्थिति 14 गोतम बोधिसत्त्व 1 गोतम बोधिसत्त्व 2 गोतम बोधिसत्त्व 3 गोतम बोधिसत्त्व 4 गोतम बोधिसत्त्व 5 गोतम बोधिसत्त्व 6 गोतम बोधिसत्त्व 7 गोतम बोधिसत्त्व 8 गोतम बोधिसत्त्व 9 गोतम बोधिसत्त्व 10 गोतम बोधिसत्त्व 11 गोतम बोधिसत्त्व 12 गोतम बोधिसत्त्व 13 गोतम बोधिसत्त्व 14 तपश्चर्या व तत्वबोध 1 तपश्चर्या व तत्वबोध 2 तपश्चर्या व तत्वबोध 3 तपश्चर्या व तत्वबोध 4 तपश्चर्या व तत्वबोध 5 तपश्चर्या व तत्वबोध 6 तपश्चर्या व तत्वबोध 7 तपश्चर्या व तत्वबोध 8 तपश्चर्या व तत्वबोध 9 तपश्चर्या व तत्वबोध 10 तपश्चर्या व तत्वबोध 11 तपश्चर्या व तत्वबोध 12 तपश्चर्या व तत्वबोध 13 तपश्चर्या व तत्वबोध 14 तपश्चर्या व तत्वबोध 15 श्रावकसंघ 1 श्रावकसंघ 2 श्रावकसंघ 3 श्रावकसंघ 4 श्रावकसंघ 5 श्रावकसंघ 6 श्रावकसंघ 7 श्रावकसंघ 8 श्रावकसंघ 9 श्रावकसंघ 10 श्रावकसंघ 11 श्रावकसंघ 12 श्रावकसंघ 13 श्रावकसंघ 14 श्रावकसंघ 15 श्रावकसंघ 16