Get it on Google Play
Download on the App Store

विश्वाला नाचवणारा शेतकरी 3

“चला, शोध करू!” कोणी म्हणाले.

“सारे दानव, मानव तर येथे. जाऊन कोणाला विचारणार? कोणाला पुसणार?”

“मी जातो. मी नेहमी त्रिभुवनात हिंडणारा, वा-याप्रमाणे जाणारा; प्रभूचे गीत गाणारा नि नाचणारा, मला नाही भय. मला सवय आहे नाचत हिंडायची, गिरक्या घेत जाण्याची.” असे नारद म्हणाला.

“नारदा लौकर ये. आम्ही किती वेळ नाचत राहणार? दोन तास झाले. बसलो तरी गरगर फिरतो. निजलो तरी गरगर फिरतो. वाचव बाबा!” सारे म्हणाले.

नारद प्रकाशाच्या वेगाने निघाले. सारे बघत भूतलावर उतरले. क्षणात हिंदुस्थानातही आले. ज्ञानकिरणांच्या प्रकाशात झटकन सारा देश त्यांनी पाहून घेतला. तो त्यांना एक माणूस नाचताना दिसला. ते पटकन त्याच्याजवळ आले. कोण होता तो मनुष्य? तो का वेडा होता? तो एक शेतकरी होता. समोर सुंदर शेत होते. भाताला लोंबी आल्या होत्या. जवळच फुलाचा मळा होता. पलीकडे सुंदर बैल चरत होते. शेतक-याच्या हातात विळा होता. बांधावरचा चारा तो कापीत होता. वा-याची झुळूक येई नि ते शेत डोले. शेतकरी आनंदला. तो तसाच उभा राहीला. शेताकडे बघून नाचू लागला.