शहाणा झालेला राजपुत्र 3
“मला तुमचा भाऊ होऊ दे. नाही म्हणू नका.” तोही म्हणाला. राजपुत्राने त्यालाही आपल्याबरोबर घेतले. ती चौघे जात होती. सर्वांना भुका लागल्या. दोन लाडू शिल्लक होते. एका सरोवराच्या काठी चौघे बसली. राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले. त्यातूनही दोन रत्ने बाहेर निघाली. अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला. सर्वांना ढेकर निघाली. आईच्या हातचा लाडू, त्याने नाही तृप्ती व्हावयाची तर कशाने?
जवळच एक शहर दिसत होते. प्रासादंचे, मंदिरांचे कळस दिसत होते. राजपुत्र दोन भावांना म्हणाला, “त्या राजधानीत जा. ही रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा. तेथे नोकरचाकर ठेवा आणि हत्ती, घोडे विकत घ्या. घोडेस्वार तयार करा. मला सन्मानाने मिरवत नेण्यासाठी या!”
दोघे भाऊ त्या नगरीत गेले. दोन रत्ने त्यांनी विकली. त्यांचे दहा लाख रुपये मिळाले. दुसरी दोन विकावी लागली नाहीत. त्यांनी राजवाडा खरेदी केला, नोकरचाकर ठेवले. राजवाडा शृंगारला गेला. ठायी ठायी गालिचे होते, ठायी ठायी आसने, फुलांचे गुच्छ होते, पडदे सोडलेले होते. चांदी-सोन्याची भांडी होती. त्या दोघा भावांनी घोडेस्वार तैनातीस ठेवले आणि हत्ती सजविला. त्याच्यावर अंबारी ठेवण्यात आली. राजपुत्राला आणायला घोडेस्वारांसह, त्या हत्तीसह ते दोघे भाऊ गेले.
आली सारी मंडळी वनात. राजपुत्र अंबारीत बसला. बहीण एका पासखीत बसली. दोन भाऊ दोन उमद्या घोड्यांवर बसले. मिरवणूक निघाली. शहरात आली. दुतर्फा लोक बघत होते. घरांतून, गच्चीतून लोक बघत होते. राजपुत्र राजवाड्यात उतरला. तेथील जीवन सुरू झाले.
राजाच्या कानावर वार्ता गेली. राजाचा एक खुशमस्क-या होता. राजाने त्याला विचारले,
“कोण आला आहे राजपुत्र?”