न्याय जिवंत झाला 5
“काय लागला निकाल?” बायकोने विचारले.
“आपण चोर ठरलो नि चोर मालक ठरला. आपण उद्यापासून मजूर झालो.” तो दु:खाने बोलला.
त्या गावातील सारे गोरगरीब केशवचंद्राच्या नावे खडे फोडीत होते. परंतु करतात काय?
या प्रांताचा राजा दौ-यावर निघाला होता. केशवचंद्राने वशिला लावून राजा आपल्या गावी येईल असे केले. गाव शृंगारण्यात आला आणि एक सुंदर सभामंडप उभारण्यात आला. तेथे राजासाठी सिंहासन तयार करण्यात आले होते. राजाच्या सत्कारसमारंभासाठी आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील शेकडो मोठमोठी माणसे योणार होती. सरदार-जहागीरहार, सावकार, व्यापारी येणार होते. तेथे फक्त गरिबांना येण्यास बंदी होती. केशवचंद्राला गावातल्या लोकांची भीती वाटत होती. राजाच्या कानावर ते कागाळ्या घलतील, अशी त्याला शंका होती. म्हणून त्याने सर्वांना ताकीद दिली की, त्या दिवशी घराबाहेर फिरकू नका. राजा जाईपर्यंत आपापल्या झोपड्यांत बसून राहा.
सभामंडप भरून गेला होता. आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील सा-या संपत्तीचे तेथे जणू प्रदर्शन होते. नटूनथटून श्रीमंत मंडळी आली होती. आणि बारा वाजले. राजा आला वाटते? हां, हे बघा घोडेस्वार! आणि वाद्ये वाजू लागली. जयघोष कानावर आले.
सारे शेतकरी भीतीने घरत बसून आहेत; परंतु भीमा कुठे आहे? गावाबाहेर एक जुने देवीचे मंदिर होते. त्या मंदिरात एक प्रचंड घंटा होती. गावात कोणी मेले, तर ती घंटा वाजविण्यात येई. भीमा आज त्या मंदिरात गेला आणि ती घंटा दाणादाण वाजवू लागला.
“कोण मेले?” म्हाता-या गुरवाने विचारले.
“न्याय मेला.” भीमा म्हणाला.
“खरेच, न्याय उरला नाही.” देवीचा पुजारी म्हणाला.