Get it on Google Play
Download on the App Store

विश्वाला नाचवणारा शेतकरी 1

फार दिवसांपूर्वीची गोष्ट. त्या काळात मोठेमोठे यज्ञ होत असत. बाराबारा वर्षेही चालत. यज्ञप्रसंग म्हणजे उत्सवाचे. जणू जत्राच. तेथे भरे. हजारो लोक यायचे जायचे. परस्परांना भेटायचे. तेथे बसलेल्या दुकानांतून माल न्यायचे. तेथे होणा-या कथाकीर्तनांतून, पुराणप्रवचनांतून धर्म शिकायचे. तेथे खेळ असत, कुस्त्या असत. नवीन नवीन नाटके व्हायची व चांगली ठरतील त्यांना बक्षिसे मिळावयाची. अशी त्या काळातील गंमत.

एकदा देवांच्या मनात आले की, कधी झाला नाही एवढा मोठा यज्ञ करावयाचा. त्यांनी दानवांना विचारलं की, “याल का यज्ञाला?” दानव हो म्हणाले. मानवांनाही निरोप आला. मानवांनीही जायचे ठरविले. देव, दानव, मानव सारे एकत्र जमणार? कधी झाली नव्हती अशी गोष्ट होणार होती. देवांनी हजारो विमाने या सर्वांना आणण्यासाठी पाठवली. सरसर विमाने येत होती; उंच जात होती. त्या विमानांचा आवाज नसे होत. ती शान्त-दान्त विमाने होती. सारी विमाने जिवंतपणी स्वर्गात चालली. ढगांतून उंच चालली. त्या विमानांतून हवा मिळण्याची व्यवस्था होती. मानवांना हवेशिवाय राहण्याची सवय नाही. देवांनी हवेशिवाय राहयचा कधीच म्हणे शोध लावला होता.

स्वर्गात आनंदीआनंद होता. नक्षत्रांची तोरणे होती. कल्पवृक्षांच्या माळा ठायी ठायी होत्या. देव स्वागताला उभे होते. देव-दानव, मानव परस्परांना भेटत होते. आणि महान यज्ञ झाला. स्वर्गातील गाईंचे सुंदर तूप अग्निनारायणाला देण्यात येऊ लागले.