न्याय जिवंत झाला 3
“बाबा, आईने घरी बोलावले आहे.” ती म्हणाली.
“कशाला ग, पोरी?”
“सावकार आला आहे घरी.”
“काय म्हणतो तो?”
“आईला म्हणाला, ‘तुझ्या बापाला काही कळत नाही.’ बाबा, शेत का तुम्ही विकणार?”
“प्राण गेला तरी विकणार नाही. तुझी आई काय म्हणाली?”
“ती म्हणाली, ‘त्यांना विचारा.’ आणखी आई त्यांना म्हणाली, ‘पैसे काय, आज आहेत उद्या नाहीत, जमीन कायमची सत्तेची. ती विकून कुठे जायचे?’ ”
“शहाणी आहे तुझी आई!”
भीमा मुलीबरोबर घरी आला. सावकार निघून गेला होता. बायकोने सारी बोलणी भीमाच्या कानावर घातली.
“साप आहे तो मेला! तो आपल्या सत्यानाश केल्यावाचून राहणार नाही!” तो म्हणाला.
“गावातील सारे शेतमालक मजूर झाले. त्यांच्या बाबतीत देव मेला, तसा आपल्या बाबातीतही मरायचा!”
“त्यांनी हिंमत सोडली म्हणून त्यांचा देव मेला! जो सत्यासाठी उभा राहतो त्याचा देव मरत नाही. समजलीस?”