शहाणा झालेला राजपुत्र 5
“काय उपाय?” राजाने विचारले.
“त्याला म्हणावे, तुझी बहीण तरी दे, नाहीतर रात्री पायी चाळीस कोस चालत जा व त्या अंधा-या दरीतील पांढरी फुले घेऊन उजाडताच हजर हो, नाहीतर डोके उडवण्यात येईल!”
राजपुत्राला निरोप कळविण्यात आला. तो रडत बसला. बहीण येऊन म्हणाली,
“दादा, का रडतोस?”
त्याने तो वृत्तान्त सांगितला.
ती म्हणाली, “गावाबाहेर जाऊन दो कोसांवर बसून राहा. चिंता नको करूस!”
राजपुत्र पायी निघाला व जाऊन बसला. बहीण घरातून बाहेर पडली आणि शहराबाहेर पडल्यावरती हरिणी बनली. वा-याप्रमाणे ती पळत सुटली. अंधा-या दरीतील पांढरी फुले तिने तोडली. ती फुले दातात धरून सूर्योदयाच्या आत ती आली. पुन्हा बहीण बनून राजपुत्राजवळ ती फुले देऊन ती म्हणाली,
“जा, राजाला ही नेऊन दे!”
राजपुत्राने ता-याप्रमाणे चमकणारी फुले राजाला नेऊन दिली. निरोप घेऊन तो परत घरी आला. राजा खुशमस्क-याला म्हणाला, “आता कोणता उपाय?”
“त्याला सांग की, बहीण तरी जे किंवा मागील राणीची समुद्रात पडलेली नथ आणून जे, नाही तर डोके उडवीन!” खुशमस्क-याने सुचविले. राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र रडत बसला. एक भाऊ येऊन म्हणाला,
“दादा, का रडतोस?”