शहाणा झालेला राजपुत्र 9
बहीण हरिणी बनून कृतज्ञतेने मधून मधून मागे बघत वा-याप्रमाणे पाडसांकडे पळत गेली.
राजपुत्र आता एकटाच राहिला. विचार करत तो निघाला. पशु-पक्ष्योतही केवढी कृतज्ञताबुद्धी! असे त्याच्या मनात येत होते. मग माणसाने किती चांगले असले पाहिजे, असा विचार त्याच्या मनात आला आणि या विचारात तो आपल्या घरी आला. पहाटेची वेळ होती. मुलगा गेल्यापासून राणीला झोप येत नसे. ती गच्चीत उभी होती. देवाला प्रार्थीत होती.
“कोण आहे?” पहारेक-यांनी दरडावले.
“मी राजपुत्र.”
“माझा बाळ! माझा बाळ!” म्हणत राणी धावतच खाली आली. तिने राजपुत्राला हृदयाशी धरले. राजाही आला. पुत्र पित्याच्या पाया पडला.
“शहाणा होऊन आलास?” राजाने विचारले.
“होय तात!” तो नम्रतेने म्हणाला. राजाने राजपुत्राला गादीवर बसवले. त्याचे लग्नही करून दिले. राजा-राणी मुलाला व सुनेला आशीर्वाद दोऊन तपश्चर्येसाठी वनात निघून गेली. नवीन राजा-राणी उत्कृष्ट राज्यकारभार चालवू लागली. सारी प्रजा सुखी झाली. तुम्ही आम्ही होऊ या. गोष्ट आमची संपली शेरभर साखर वाटली.