Get it on Google Play
Download on the App Store

न्याय जिवंत झाला 4

काही दिवस गेले. केशवचंद्राने न्यायालयात फिर्याद केली. भीमाकडे असलेली जमीन वास्तविक आपली आहे. जुने कागदपत्र सापडले आदेत त्यावरून हे सिद्ध होत आहे, वगैरे त्याचे म्हणणे. न्यायाधीश केशवचंद्राच्या मुठीतले. पैशाने कोण वश होत नाही! भीमाला न्यायालयात बोलावण्यात आले. केशवचंद्राने म्हातारेशेतकरी पैशाने विकत घेऊन साक्षीदार म्हणून आणले होते. त्याने आपली बाजू मांडण्यासाठी कायदेपंडितही आणला होता. भीमाची बाजू कोण मांडणार? तो न्यायाधीशास एवढेच म्हणाला,

“महाराज, देवाधर्माला स्मरून मी सांगतो की ही माझी जमीन आहे. वाडवडिलांपासून ही चालत आली आहे. सावकाराला बघवत नाही. हजार रुपये द्यायला तयार झाला होता...”

“हजार रुपये” थापा मार! त्या तुकड्याचे का कोणी हजार रुपये देईल?”

“देवाला माहीत आहे!”

“देव दूर आहे आभाळात. येथे तुम्ही आम्ही आहोत. कागदपत्रं काय सांगतात?” वकील म्हणाला.

न्यायाधीशाने भीमाची मालकी काढून घेतली. केशवचंद्राचीच जमीन आहे, असा निर्णय त्याने दिला. भीमा बाहेर येऊन आकाशाकडे हात करून म्हणाला,

“तुझ्या जगात देवा, का न्याय नाही?”

“न्याय आमच्या हातात असतो, भीमा. देवबीव सत्तेजवळ असतो.” वकील कुर-र्याने म्हणाला.

भीमा दु:खाने घरी गेला. तो कपाळाला हात लावून बसला.