शहाणा झालेला राजपुत्र 2
“कोण तुम्ही, कुठल्या? या रानावनातून एकट्या कुठे जाता?”
“मी तुझी बहीण होऊ इच्छिते. मला नाही म्हणू नकोस.” ती म्हणाली.
“ये माझ्याबरोबर. भावाला बहीण झाली.” तो म्हणाला.
दोघे जात होती. दोघांना भूक लागली. एका खळखळ वाहणा-या झ-याच्या काठी दोघं बसली. त्याने एक लाडू फोडला. त्यातून पुन्हा एक रत्न निघाले. अर्धा अर्धा लाडू दोघांनी खाल्ला. इतक्यात केविलवाणा शब्द कानी आला. एका सापाने बेडकाला तोंडात धरले होते. बेडूक वाचवावा तर सापाची भूक कशी शमवायची? राजपुत्राने जवळच्या तलवारीने मांडीचे मांस कापून सापाकडे फेकले. तो लाल तुकडा पाहून बेडकाला सोडून साप तिकडे धावला. बेडुक टुणटुण उड्या मारीत गेला. सापाची भूक शमली, बेडकाचेही प्राण वाचले.
भावाची रक्तबंबाळ झालेली मांडी पाहून बहिणीचे डोळे भरून आले. ती पटकन कुठेतरी गेली नि पाला घोऊन आली. तिने त्या पाल्याचा चोळामोळा करून तो पाला आपला पदर फाडून जखमेवर बंधला. दोघे पुढे जाऊ लागली. तो पाठीमागून कोणी येत आहे असे त्यांना वाटले. दोघे थांबली. एक तरुण येत होता.
“कोण रे तू? कुठला? रानावनात एकटा का?” राजपुत्राने विचारले.
“मला तुमचा भाऊ होऊ दे.” तो म्हणाला.
“ठीक. हरकत नाही.” राजपुत्र म्हणाला.
“तिघे चालू लागली. तो आणखी एक तरुण धावत आला.’
“तू रे कोण?” राजपुत्राने विचारले.