Get it on Google Play
Download on the App Store

शहाणा झालेला राजपुत्र 6

राजपुत्राने वृत्तान्त निवेदिला.

“रडू नकोस, दादा. शहराबाहेर जाऊन बस. चिंता नको करूस!”

राजपुत्र शहराबाहेर जाऊन बसला. तो भाऊही बाहेर गेला नि तो बेडूक बनला. डराँव, डराँव करून त्याने बेडकांना हाका मारल्या. लाखो बेडूक जमा झाले. तो त्यांना म्हणाला, “त्या राजपुत्राने माझा प्राण वाचविला आहे. आपण त्याच्यासाठी काही करू या. आपण समुद्रात रात्रभर पुन:पुन्हा बुड्या मारू. मिळतील ते मोती तोंडात धरून आणू, राजाच्या अंगणात ढीग घालू!”

सा-या बेडकांनी ऐकले आणि त्याप्रमाणे त्यांनी केले. राजाच्या दारात झळाळणा-या मोत्यांचे ढीग पडले.

भाऊ राजपुत्राकडे येऊन म्हणाला, “राजाला अंगणातील मोत्यांपैकी राणीच्या नथीची मोती निवडून घ्यायला सांग. लाटांनी नथ मोडली. मोती अलग झाले. घ्या म्हणावे ओळखून!”

राजपुत्र राजाला तसे सांगून आपल्या राजवाड्यात परत आला. राजाने खुशमस्क-याला विचारले, “आता काय?”

“त्या राजपुत्राला म्हणावे, बहीण दे, नाहीतर स्वर्गात जाऊन तेथे आमच्या वडिलांची करमणूक करावयाला कोणी आहे की नाही ते विचारून ये’ ” खुशमस्क-याने सुचविले.

“तो स्वर्गात कसा जाणार?”

“तुमच्या वडिलांना मेल्यावर सरणावर घालून स्वर्गात पाठविले. त्याच रस्त्याने राजपुत्राला पाठवू!”

राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली. राजपुत्र सचिंत होऊन बसला. तो दुसरा भाऊ येऊन म्हणाला, “दादा, का दु:खी?” राजपुत्राने सारी कथा सांगितली.