वैकुंठींचे मुख्य पार्षदगण
वैकुंठींचे मुख्य पार्षदगण
वैकुंठी हरिभक्त पूर्ण । ब्रह्मा देखताहे आपण । त्यांची नांवें सांगूंशके कोण । मुख्य पार्षदगण ते ऐका ॥३३॥
नंद सुनंद मुख्यत्वें पूर्ण । बल आणि प्रबलार्हण । धाता विधाता निकटधन जय विजय जाण द्वारपाळ ॥३४॥
चंड प्रचंड सुशीळ । भद्र सुभद्र पुण्यशीळ । कुमुद कुमुदाक्ष सकळ । हा पार्षदमेळ श्रीहरीचा ॥३५॥
इहीं पार्षदगणांसमवेत । ब्रह्मा देखे श्रीभगवंत । त्याते भजतां निजभक्त । स्वानंदयुक्त सर्वदा तो ॥३६॥
सप्रेम सभ्दावी सात्विक । त्यांसी सदा हरी सन्मुख । तुष्टला होय प्राङ्मुख । निजानंदे सुख सर्वदा देत ॥३७॥
हरिदर्शनाचा महिमा
ज्याचे दर्शन स्वयें गोड । विसरवी अमृताची चाड । पहातयाचें पुरे कोड । दृष्टि होय गोड देखणेपणें ॥३८॥
त्या निजभक्तांचे ठायी । नाममात्र स्मरतां देही । मृत्यु रिघों नशके कांहीं । अमृतरुप पाही यापरी भक्त ॥३९॥
ज्याचें नाम निवारी जन्ममरण । त्याचे भाग्यें झालिया दर्शन । भक्तांसी तो सुप्रसन्न । प्रसन्नवदन गोविंद पैं ॥४०॥
आकर्णविशाळनयन । दोहीं प्रांतीं आरक्त पूर्ण । यालागीं तो अरुणलोचन । स्वयें चतुरानन हरि देखे ॥४१॥
ब्रह्मदेवाला भगवंत कसा दिसला ?
मागुतेनी तो कैसा भगवंत । निजभाग्यें विधाता देखत । माथां मुकुट रत्नखंचित । सुमनीं संयुक्त कबरीबंध पैं ॥४२॥
चतुर्भुज घनसांवळा । मकरकुंडलें कौस्तुभ गळां । वैजयंती वक्षः स्थळा । आपाद वनमाळा रुळत ॥४३॥
विजू शरण आली हरीसी । अस्ता जाणें खुंटलें तीसी । तैसा पीतांबर कासेसी । दिव्यतेजेंसी तळपतसे ॥४४॥
नाभीं आवर्तला आनंद । परमानंदें वाढलें दोंद । सर्वांगें सच्चिदानंद । स्वानंदकंद शोभतसे ॥४५॥
पाहतां हरीची करतळें । संध्याराग लाजिन्नला पळे । अधर आरक्तपोवळें । सुकुमार रातोत्पळें तैसे चरण ॥४६॥
चरणी तोडर गर्जती देखा । ध्वजवज्रामकुशऊर्ध्वरेखा । पाहतां पायींच्या सामुद्निका । सनकादिकां आनंद बहु ॥४७॥
पडतां पायींच्या पायवण्यासी । शंकर वोढवी मस्तकासी । तेणें शिवत्व आलें त्यासी । अद्यापि शिरीं वाहतसे ॥४८॥
त्याचिये वक्षः स्थळी वामा । वामांगी बैसलीसे रमा । तिच्या भाग्याची थोर सीमा । नवर्णवे महिमा श्रुतिशास्त्रां ॥४९॥
रमा बैसतांचि अर्धांगीं । तिच्या निजशक्ति अनेगी । उभ्या तिष्ठती निजविभागीं । आज्ञाविनियोगीं अधिकार त्या ॥५०॥