श्रोत्यांना विनंती व कथासूत्र
आतां अवधारा ग्रंथकथन । कल्पादि हें पुरातन । हरिब्रह्मयांचें जुनाट ज्ञान । तेथें अवधान श्रोतीं द्यावें ॥२५॥
जेणें संतोषती ज्ञानसंपन्न । सुखें सुखरुप होती मुमुक्षुजन । तें हें हरिब्रह्मयांचें ज्ञान । तेथें अवधान श्रोतीं द्यावें ॥२६॥
जो जडमूढ होता तटस्थ । तो चौश्लोकीं जाण नेमस्त । ब्रह्मा केला ज्ञानसमर्थ । तो अगाध ज्ञानार्थं अवधारा ॥२७॥
पावोनि चतुः श्लोकीचें ज्ञान । ब्रह्मा झाला ज्ञानसंपन्न । करितां सृष्टीचें सर्जन । तिळभरी अभिमान बाधीना ॥२८॥
त्या ज्ञानाची रसाळ कथा । मर्हाटीया सांगेन आतां । येथें अवधान द्यावें श्रोतां । हे विनवणी संतां सलगीची ॥२९॥
पूर्ण सलगी दिधली स्वामी । ह्नणोनि निः शंक झालों आह्मी । परी जें जें बोलेन ज्ञानांग मी । तें सादर तुह्मी परिसावें ॥३०॥
ऐसे प्रार्थुनी श्रोतेजन । प्रसन्न केले साधुसज्जन । पुढील कथेचें अनुसंधान । एका जनार्दन सांगेल ॥३१॥