स्नेहमयीचा अपार शोक 5
शिपायांनी गाडीवानाला बाजूला बोलावून कानात सांगितले. एवढी माणुसकी अद्याप तिथे होती. काही हरकत नाही. आशा आहे, मग मानवी जीवनाची ! अजून माणुसकीचा किरण चमकत होता तिथे.
गाडीवानाने गाडी हाकलली. स्नेहमयी माशा वारीत होती. ती तोंडाजवळ तोंड नेई. “नाही. बोलत नाही- मारले रे- हे पाहा दंडे- हे वळ मारले रे- मारले- आई अरे, पाहा रे, हे वळ- हे पहा रक्त फुटले आहे रे ! अरे, सारे अंग ठेचले रे ! कुसकरले रे, फूल- आई-आई राम- अरे, पाहा रे ! आहे का रे जीव ? आहे का रे ? बोलतील का, बघतील का माझ्याकडे ? बोला हो-अरेरे- मेलेले का दिले ? कसे नेले आणि असे दिले ! फुललेले नेले, कोमेजलेले दिले ! हसणारे नेले- आणि रडणारे रडवणारे दिले. मिटलेल्या डोळ्यांचे दिले रे दैत्यांनी- बघ रे- पाहा रे- थांबव गाडी- पाहा.”
“आई, शिपायांनी सांगितले की, ते सकाळीच देवाकडे गेले आई, रडू नका. घरी नेऊ. राखालच्या देहाला अग्नीही नाही. आई महाराजांचा देह तरी मिळाला, हीच पुण्याई. अग्निसंस्कार तरी होईल- आई !” गाडीवान समजूत घालीत होता.
“अयाई ! हाल करुन की रे मारले ! नको रे, वैर्यावरही नको रे देवा असा प्रसंग !” स्नेहमयी रस्त्यातून विलाप करीत जात होती. रस्त्याकाठच्या शेतांतील शेतकरी काम थांबवून पाहात. झाडावर पक्षी तो विलाप ऐकून गाणे थांबवीत. स्नेहमयी पतीकडे पाही. मध्येच हात धरून पाही. नाकाशी सूत धरून पाही ! “हात गरम का लागला ? हलले का सूत ! छेः भास-” असे मनात येऊन पुन्हा विलाप करी.