राजा दिगंबर राय 1
राखालच्या गावापासून काही अंतरावर एका गावात एक श्रीमंत जमीनदार राहात होते. राजा दिगंबर राय त्यांचे नाव. ते पन्नाशीच्या आतबाहेर होते. त्यांचे शरीर अद्याप चांगले तेजस्वी दिसे. अत्यंत धार्मिक म्हणून त्यांची ख्याती होती. कोणी वेद म्हणणारा आला, पंडीत आला तर त्याला दिगंबर राय ठेवून घ्यावयाचे. त्याला शालजोडी नाहीतर चांगली दक्षिणा द्यावयाचे व म्हणायचे, “बारा बारा वर्षे श्रम करुन तुम्ही वेद मुखोद्गत केला, परंतु आता समाजात कोण विचारतो ? ही इंग्रजी येते आहे. तुम्हांला कोणी खायलाही देणार नाही. वेदांची पुस्तके छापतील. हल्ली छापतात पुस्तके. वेद घरोघर होईल. त्याची पूज्यता जाईल. त्याला भ्रष्ट करतील ! वेदाच्या पोथीवर मग बसतील. वाटेल ते करतील. हे सारे भ्रष्टाचरण होण्यापूर्वी माझे डोळे मिटू दे म्हणजे झाले !” दुष्काळ पडला, पीक नीट आले नाही तर घरातील धान्य सारे वाटायचे व म्हणायचे कसे, “तुम्ही वाचलेत तर माझे पिकवाल ! हे घरात भरून ठेवले होते ते तुमच्यासाठीच. घरच तुमचेच आहे !” सारा गाव त्यांच्यासमोर प्रसन्न असे. ते आपली चादर अंगावर घालून व जाड बांबूची काठी घेऊन शेतावर फिरायला निघाले की वाटेत सारे त्यांना नमस्कार करायचे. अनेकांची ते चौकशी करायचे. एका गरीब शेतकर्याच्या घरी एक मुलगा आजारी होता. दिगंबर रायांकडे औषधी संग्रह असे. पूर्वी खेड्यापाड्यांतून जे श्रीमंत असत त्याच्या घरी औषधे असत. जणू गावातील मोफत दवाखानाच तो ! कारण श्रीमंताने जरी पैसे देऊन औषधे विकत घेतली असली तरी गरिबाला तो फुकटच देई. गरिबाला विकून- जास्त किंमतीला विकून- पैसे घ्यावे ही हल्लीची धनिकविद्या. कृपणविद्या त्या काळी नीच मानली जाई. गरिबाला देणे, यातच कृतार्थता वाटे. आपल्या घरी आयत्या वेळी उपयोगी पडणारे औषध मिळाले, याचाच आनंद, तो सात्विक आनंद श्रीमंतांस होई. त्या आजारी मुलास पाहावयास दिगंबर राय त्याच्या झोपडीत गेले. त्याला पाहिले. ते म्हणाले, “बरा होईल. अशक्त आहे. मी औषध देईन ते नेत जा. रोज न्यायला यावे लागेल. सकाळ-संध्याकाळी दोनदा खेप करावी लागेल.”
“महाराज, दहा वेळा येईन. परंतु पोरगा बरा होऊ दे. मला कामाला मदत करील. हल्ली बायकोला सूत वगैरेही काढून मदत करता येत नाही. सूत कोणी घेत नाही. आम्हीच बापलेक खपून काय दाणे आणू ते. पोटसुद्धा कधीकधी भरत नाही.” तो शेतकरी म्हणाला.
“आजाराचे तेच कारण आहे. मी औषध देईन. होईल पंधरा दिवसांत बरा.” असे म्हणून दिगंबर राय घरी गेले.
सायंकाळी तो शेतकरी आला. दिगंबर रायांनी वसंताची एक मात्रा त्याच्याजवळ दिली. म्हणाले, “ही मात्रा अर्धा शेर दुधात उगाळून दोन्ही वेळ देत जा.”