स्नेहमयीचा अपार शोक 4
गाडी वार्याच्या वेगाने निघाली. दिगंबर रायांना घ्यावयास निघाली होती. गाडी तुरुंगाजवळ येत होती. सकाळचे आठ वाजले होते. दिगंबर राय खोलीबाहेर पडले आहेत. वॉर्डर त्यांना दंडे मारीत आहेत. “साला कितना सोता है ? उठता नही ? क्या मरनेका ढोंग करता है !” असे म्हणून दंडे मारीत होता. मेलेल्या दिगंबर रायांनाही दंडे मिळत होते. धन्य तो देह- जो मृत होऊनही- शव होऊनही लोकांच्या क्रोधाला शांत करीत होता !”
“क्या सच ही मर तो नही गया ?”
शिपाई आले. त्यांनी ओढला. फरफटत तो मंगल देह ओढला ! काही नाही ! “घाण का येते? मेला साला, हमको मोत के पीछे भी सताता हे, सच्ची बात भी नही बोलता की भाई मैं मर गया !” असे म्हणून ते प्रेत ओढले. कोपर्यात पायाने ढकलले !
‘तो तुरुंग ! भेटतील दिसतील मला !’ स्नेहमयी अधीर झाली. एकेक क्षण मोलाचा, तो क्षण युगाचा वाटे, लांब दीर्घ वाटे. तुरुंगाच्या भीषण दरवाजासमोर- त्या यम-नगरीच्या द्वारासमोर गाडी उभी राहिली. यमदूत आत एकदम जाऊ देत ना ! तुरुंगावरील अधिकार्यांना कळविण्यात आले की, कोणी बाई स्नेहमयी, पतीला मागण्यासाठी आली आहे. सत्यवानाचे प्राण परत मागण्यासाठी सावित्री यमधर्माकडे खर्याखुर्या यमधर्माकडे- गेली होती म्हणून प्राण मिळाले. खर्या यमापेक्षा हे यमाचे अवतार फार दुष्ट ! त्यांच्या तावडीत गेलेले प्राण कसे परत मिळणार ? एक वेळ मालक देईल, परंतु मधला कोठावळा किंवा हाताखालचा नोकरच हाती ठेवा पडू देत नाही. तोच ठेवा लांबवतो. स्नेहमयीचा प्राणठेवा- पतिठेवा कोणी लांबवला तर नाही ना ?
जेलरला अद्याप हुकुम आला नव्हता. आजच्या टपालाने आला असता. त्याने स्नेहमयीला दुपारी या- अजून हुकूम आला नाही- दुपारच्या टपालाने येईल,- आला तर त्यांना सोडण्यात येईल-” असे कळवले. परंतु इतक्यात वॉर्डर व शिपाई “वो कैदी तो साब मर गया- बिलकुल. ठंडा- लकडीके माफक पडा है !” असे सांगत आले.
“तो प्रेत वो बाईको दे देव- बाहर खडी होगी- जलदी जाव !” जेलर म्हणाला.
स्नेहमयीला थांबा असे सांगण्यात आले. “आताच घेऊन जा- आम्ही आणतो.” असे त्यांनी सांगितले. स्नेहमयी आनंदली, पुलकित झाली. डोळे आनंदाश्रूंनी चमकले. चर्या प्रफुल्लित झाली. गाडीत तिने गादी घातली. चार जणांनी दिगंबर रायांना धरून आणले. “अयाई, फार का हो आजारी आहेत- अयाई- मान टाकली हो- होतील, घरी बरे होतील,- आणा- मी माझ्या मांडीवर घेते.” आशामयी स्नेहमयीला तो देह जणू अजून सजीव दिसत होता. ती गाडीत बसली. पतीचे शिर तिने मांडीवर घेतले. “हाक गाडी, जलदी हाक !” गाडीवानाला ती म्हणाली.