चार दिवसांचे चांदणे 1
दिगंबर रायांच्या मधल्या मुलाचा विवाह ठरला होता. नवरदेवासाठी व वधूसाठी त्यांना तलम हातसुताची मंगलवस्त्रे पाहिजे होती. परंतु कशी मिळणार ? न कळत गुप्तपणे विणून घेतली तर ? काय हरकत आहे ? दिगंबर रायांच्या मनात विचार आला व विणकर राखाल याला त्यांनी बोलावणे पाठवले.
अशक्त झालेला राखाल दिगंबर रायांकडे आला. दिगंबर राय दिवाणखान्यात बसले होते. “राखालने नमस्कार केला व तेथील बैठकीवर तो बसला. तेथे दुसरे कोणी नव्हते, राखाल, अलीकडे तुम्ही मिलच्या सुताचेच कापड विणीत असाल ?” दिगंबर रायांनी प्रश्न केला.
“ते मेलीचे मेलेले सूत ! ते मी मेलो तरी हातात धरणार नाही. नाव तरी काय- म्हणे मेलीचे सूत ! माझ्या घरी उपासमार होत आहे. परंतु माझ्याच्याने कलेचा खून करवत नाही. जाडेभरडे सूत, देशी सूत, बायाबापड्यांचे सूत मला विणावेसे वाटत नाही ; व ते मेलीचे तर नकोच नको ! या हातांनी कला वाढवली, तिचाच खून करू का ? या हाताने फूल वाढवले, ते कुस्करु ? महाराज, दहापंधरा दिवसांत राखालची राख होईल ! या हातांनी हल्ली मी नांगर धरतो ! मला नाही सवय ! मी मजूर झालो आहे ! पाचपाचशे रुपयांची सणंगे विणणारा मी आज हमाल झालो आहे ! हमाल झाल्याचे मला वाईट वाटत नाही, परंतु आज्या-पणज्यांची कला मरणार, याचेच वाईट वाटते ! मागो माझे वडिल होते. त्यांनी ते राजे लक्ष्मणराय राय व नवीनचंद्रराय होते ना, त्याच्या घरच्या लग्नासाठी पाचपाचशे रूपयांची पातळे विणून दिली होती! कशी तलम होती सांगू! मी त्या वेळेस लहान होतो. ती कला शिकत होतो. पदरावर सुंदर फुले होती. परंतु मी अभागी! ही बोटे, हे हात पाहिले की वाईट वाटते!” ऱाखालच्या डोळ्यांत खरोखर पाणी आले. त्या कलावानाचा मुखचंद्र दुःखाने काळवंडला गेला. पर्जन्यधारांनी आच्छादला.
“राखाल, माझ्या मुलाचा विवाह आहे. मुलासाठी धोतरजोडा व वधूसाठी दोन पातळे पाहिजेत. अगदी तलम, बारीक, सुंदर ! परंतु तुम्हांला गुप्तपणे विणावी लागतील ! माझ्या घरी तुम्हांला जागा देतो. तुम्ही येथे विणा.” दिगंबर राय म्हणाले.
“चालेल. तुमचा आनंद मी का वाढवू नये ? तुमचा आनंद मी जाणू शकतो. तुम्हांला ही मेलेल्या सुताची, गाई-बैल मारून चरबी लावलेल्या सुताची ही कपडे आवडत नसतील, ती सहन होत नसतील ! तुम्ही कलावान लोक. कारागीर लोकांना आधार देणारे तुम्ही. तुमचे मन मी ओळखतो. येतो, माझी बायको, मी व मुलगा येथे येतो. विणून देतो विवाहमंगल वस्त्रे !” राखाल म्हणाला.