स्नेहमयीचा अपार शोक 2
हाय रे देवा ; तुम्ही त्यांची करा हो सुटका. माझे धर्मबंधू व्हा. काय गुन्हा हो केला ? मुलाच्या लग्नासाठी बारीक धोतर विणून घेतले ! ते निर्दोष आहेत. तिळभर नाही हो दोष. सारा जन्म परोपकारात गेला त्यांचा. म्हणायचे, आधी गरिबाला द्यावे. घरात एखादवेळेस मुळीच दूध राहावयाचे नाही. वाटून टाकावयाचे. म्हणायचे तो आजारी आहे, फलाण्याचा मुलगा आजारी आहे. एक दिवस रात्री निजताना प्यावयास देण्यासाठी गाईचे दूध थोडी साखर घालून ठेवले होते. रोज रात्री कढत दुधाचा घोट घेऊन निजत. म्हणजे जरा झोप लागे. शेजारी हेरंब-चरण आजारी होते. त्यांना आयत्या वेळी रात्री दूध हवे होते. मी नाही म्हटले. औषध सकाळी द्यायचे ठरले त्यांना, कारण दूध नव्हते. निजावयाच्या वेळेस मी चांदीच्या फुलपात्रात घालून दूध नेऊन दिले. “दूध होते तर घरात. तू खोटे बोललीस. माझ्या पोटात जाऊन का सोने होईल-वेडी !” असे म्हणून हेरंबचरणांकडे दूध घेऊन गेले व म्हणाले, “हेरंबबाबू, दूध मिळाले. ही पूड घ्या व वर हे दूध घ्या !” असे होते हो. देवाने अशी का हो म्हातारपणी दशा आणावी ! देव- कसा हो असा निष्ठुर देव- सात वर्षे ! सात दिवसही तुरुंगात, त्या नरकात नाही हो जगावयाचे. फुलाला आगीत की हो टाकले ! माझे प्राण, माझे सर्वस्व नेले- हिरावून नेले- हाल हाल मांडले. येथे त्यांचे मित्र होते. मी त्यांच्याकडे सांगावयास आले की, पाहा त्यांच्या सुटकेची खटपट करून ! मी गयावया केल्या, परंतु ते स्नेही, त्यांचे स्नेही मला दारात उभी राहू देत ना. कधी घरात असून घरात नाही असे नोकर, देवडीवाला येऊन सांगे. मी अबला-हतभागिनी- पापिणी- काय करू? ही गंगामाई हीच आता आधार ! तुम्ही वाचवा हो त्यांना. आगीतून काढा हो फूल, घाणीतून काढा हो हिरा ! माझे धर्मबंधू व्हा-व्हा- व्हा ! मला पदरात घ्या.” स्नेहमयीची ती करुणामय कहाणी ऐकून त्या धर्मात्म्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. त्याने चादरीने आपले अश्रू पुसले. “मी खटपट करतो माई. तोपर्यंत माझ्याकडे राहा. मी शक्य ते सारे करतो.” ते म्हणाले.
गाडी घरी आली. स्नेहमयीचे प्रेमपूर्वक स्वागत झाले. परंतु तिचे लक्ष खाण्यापिण्यात, झोपण्यात कशात नव्हते. दोन घास आज तिने स्नान करुन खाल्ले व जपमाळ घेऊन तुळशीजवळ जपत बसली. रात्री अंथरुणावरह निमित्ताला ती पडली. परंतु पुन्हा उठून रामरायाला आळवीत राहिली.
दिनेशचंद्रांची मोठमोठ्या अधिकार्यांशी ओळख होती. ते वरती भेटले व त्यांच्या शब्दाला, त्यांच्या वकिलीला यश आले. दिगंबर रायांना सोडून देण्याचे आम्ही लिहितो, असे अधिकार्यांनी दिनेशचंद्रांना सांगितले. दिनेशचंद्रांना अत्यानंद झाला. त्या आनंदाला तुलना नव्हती. दुसर्याचे दुःख दूर करता यावे व मग जो आनंद होतो, त्याची कल्पना ज्याची त्यालाच येणार !
दिनेशचंद्रांनी स्नेहमयीला ती अमृतमयी वार्ता सांगितली. तिच्या जीवनात जीवन आले, डोळ्यांत तेज आले, शऱीरात चैतन्य आले, कुडीत जणू प्राण परत आले. “मी आपली ऋणी आहे. महाराज, अनाथावर उपकार केलेत- मी जन्मोजन्मी विसरणार नाही.” स्नेहमयी म्हणाली.
“देवाची कृपा, मी कोण !” ते म्हणाले.
“मी आता माझ्या गावी जाते. ते येथील. तुरुंगाच्या दाराशी गाडी घेऊन जाते. त्यांना घेऊन येते. माझ्या राजाला घेऊन येते. त्यांना चालवतही नसेल. त्यांचा हात धरून गाडीत बसवीन. मी जाते. महाराज, धर्मभगिनीला आशीर्वाद द्या. निरोप द्या !” स्नेहमयी म्हणाली. स्नेहमयीने घरातील नारीजनांचा निरोप घेतला. तिला कुंकू लावण्यात आले. जणू गेलेले कुंकू परत आले. जाणारी-विझणारी वात- पुढे सरकवण्यात आली. स्नेहमयी निघाली.