Get it on Google Play
Download on the App Store

चार दिवसांचे चांदणे 3

राखाल आपल्या योगात मग्न झाला. योगच तो. त्याच्या इंद्रियांची ती योगस्थिती होती. झिरझिरीत, तलम विवाहकौतुकाची वस्त्रे तयार होऊ लागली. विवाहासाठी मन, बुद्धी, शरीर ही जो तयार केली जात असतात, त्याप्रमाणे वर्षभर ती वस्त्रे तयार केली जात होती.

विवाहाची वेळ समीप आली. सोनार अलंकार घडवू लागला, बायका लाडू बांधू लागल्या, राखाल वस्त्रे संपवू लागला. तो पाहा, सुंदर मंडप घातला जात आहे. तो मंडप कापडला आहे. तरी मिलच्या सुताच्या कापडाने कापडलेला नाही. जाडेभरडे आय़ाबहिणींच्या हातचे सूत, त्याची विणलेली जाड खादी, ती अत्यंत स्वच्छ धुवून आणून तिने मंडप कापडला आहे. मंडपाचे खांब लाल पागोठ्यांनी विणले गेले आहेत, कापडले गेले आहेत. मंडपाच्या सभोवती पीतांबराच्या चुण्या करून झालरी लावल्या आहेत. सार्‍या गावातील घाण झाडून निघत आहे. वधूक़डील मंडळी उतरावयासाठी, जानोशासाठी एके ठिकाणी जागा ठरवलेली आहे. तेथेही सुंदर मंडप घातलेला आहे. हंड्या, झुंबरे व गोलक लावलेले आहेत. खांबांना सुंदर हिंदी चित्रकलेचे नमुने लावले आहेत. सार्‍या गावाला काम मिळाले आहे, धंदा मिळाला आहे ; आनंदही मिळाला आहे. श्रीमंत व उदार दिगंबर रायांच्या मुलाचे लग्न, ते सार्‍या गावक-यांचेच लग्न होते.

माळी फुलांचे हार गुंफीत होते, फुलांचे गुच्छ बांधीत होते. बागवान केळीची पाने कापून देत होता, मळेवाला भाजी- उत्कृष्ट भाजी आणून देत होता. ते पाहा प्रसिद्ध बाजेवाले आले आहेत. ते सनई इतकी सुस्वर आळवतात की, मंडळी जेवेत असली तर लाडू हातात राहतो! खाण्यापिण्याचे भान ते विसरतात. उत्कृष्ट चौघ़डा वाजवणारे व उत्कृष्ट सनईवाले आले आहेत.

वधूकडील मंडळी आली. त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांची सारी व्यवस्था उत्कृष्ट ठेवण्यात आली होती. उद्या विवाहाची वेळा. सूर्यास्त होताच, पश्चिम दिशेचे व सूर्यनारायणाचे मीलन होताच वधूवरे परस्परांस माळा घालणार होती. आकाशातील ते लग्न व हे मर्त्य भूमीवरील लग्न ! दिवसभर सूर्य दूर असतो. आपल्या पश्चिम समुद्रातील राजवाड्यातून, आनंदधामातून पूर्वेकडे जातो- दिवसभर भटकून, दमून, थकून जातो. परंतु सायंकाळी आपल्या प्रियेस- पश्चिम वधूस मिळतो. तिला सांगतो, “सखी, दिवसभर मी दूर असलो तरी माझ्या हृदयात प्रेम आहे- खरेच प्रेम आहे. प्रेमासाठी कर्तव्य विसरून चालणार नाही. प्रेम हे हृदयात फुललेले आहे. त्या प्रेमाचाच प्रकाश मी या जगास देत असतो- तो तुझ्या व माझ्या प्रेमाचा प्रकाश सार्‍या रोमरोमांतून बाहेर पडतो- त्रिभुवनात पसरतो हो. रुसू नको, रागावू नको.” त्या दिव्य स्वर्गीय प्रेमाची भेट वर आकाशात होत असता दिगंबर रायांच्या मुलाचा विवाह लागावयाचा होता. गाई रानातून भरल्या कासेने, तृषार्त भूमीक़डे धावत जाणार्‍या बेफाम नदीप्रमाणे धूळ उडवीत, गोठ्यात परत येत असतात त्या मंगल व वत्सल गोरज मुहूर्तावर तो विवाह लागावयाचा होता.